Tuesday, May 12, 2026

Navnath Ban : पंतप्रधानांना सल्ले देण्यापेक्षा आधी पक्षाच्या इंजिनाची दिशा बघा

Navnath Ban : पंतप्रधानांना सल्ले देण्यापेक्षा आधी पक्षाच्या इंजिनाची दिशा बघा

नवनाथ बन यांची राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला काटकसरीचे आवाहन केल्यानंतर पोटात दुखू लागलेल्या राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना सल्ले देणे सुरु केले आहे. राज ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या ध्येय-धोरणांसाठी आणि पक्षवाढीसाठी एव्हढे मोठे ट्वीट लिहिले असते तर त्याचा अधिक फायदा झाला असता. मात्र आपल्या पक्षाच्या वाताहतीकडे पहायाला ते तयार नाहीत, अशा शब्दात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम असल्यानेच जनतेने त्यांना तीन वेळा पंतप्रधान म्हणून निवडून दिल्याचे सांगत श्री. बन म्हणाले की पंतप्रधानांच्या आवाहनानंतर शरद पवार या देशामध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे म्हणत आहेत. पवारसाहेब, जेव्हा इंदिरा गांधी यांनी सोने खरेदी करू नका असे आवाहन केले होते, तेव्हा कुणामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती? तुमचे यूपीए सरकार होते आणि तुम्ही कृषीमंत्री होता, तेव्हा महाराष्ट्रात रोज शेकडो शेतकरी आत्महत्या करत होते तेव्हा तुम्हाला अस्वस्थता जाणवली नव्हती का? तेव्हा त्याबद्दल तुम्ही पावले टाकली होती का?

जेव्हा काँग्रेसचे, यूपीएचे सरकार होते तेव्हा पेट्रोल आणि डिझेल पंप रात्री आठ ते सकाळी आठपर्यंत बंद असत, तेव्हा कुठे गेली होती तुमची अस्वस्थता? यूपीएच्या कार्यकाळात टू जी आणि थ्री जी स्कॅम झाले होते आणि मोठ्या प्रमाणात इतरही घोटाळे झाले होते, तेव्हा तुम्ही अस्वस्थतेबद्दल चकार शब्दही बोलले नव्हते, याकडे श्री. बन यांनी लक्ष वेधले.

रोहित पवार यांनी एसआयआर, निवडणूक आयोगावर टीका करण्याचे धंदे बंद केले पाहिजेत, असे सुनावत श्री. बन म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये एसआयआरमुळे भाजपाचा विजय झाला नाही, तर ममता दीदींची दहशत संपवण्याचे काम पश्चिम बंगालच्या जनतेने केले आहे. ''एसआयआर''मध्ये सर्वाधिक नावे ज्या दहा मतदारसंघांमध्ये वगळली गेली, त्या दहापैकी आठ ठिकाणी टीएमसीचा विजय झाला आहे. रोहित पवारांनी आधी आपल्या मतदारसंघात, आपल्या पक्षात काय चाललेय ते पहावे आणि नंतर निवडणूक आयोग आणि इतर बाबींवर टीका-टिप्पणी करावी. खरे तर त्यांना वाटते की आपण लवकरच राज्याचे, देशाचे नेतृत्व करावे; परंतु त्यासाठी अजून वेळ आहे, अशा शब्दात श्री. बन यांनी रोहित पवार यांना फटकारले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा