Sunday, May 10, 2026

BMC News : नगरसेवकांना गृहीत धरून काम करू नका; महापौरांनी अधिकाऱ्यांचे टोचले कान

BMC News : नगरसेवकांना गृहीत धरून काम करू नका; महापौरांनी अधिकाऱ्यांचे टोचले कान

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मागील पावणे चार वर्षे नगरसेवक नव्हते म्हणून महापालिका प्रशासनातील अधिकारी जर आता नगरसेवकांना गिनतीत धरत नसतील तर हे चालणार नाही. आणि नगरसेवकांना गृहीत धरून जर ते काम करत असतील ते तर मुळीच चालणार नाही. नवनिर्वाचित नवीन नगरसेवकांना तर अधिकाऱ्यांनी गृहीत धरून काम करूच नये. शेवटी प्रत्येक नगरसेवकाला ४० ते ५० हजार लोकांनी निवडून दिलेले आहे. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकांचा सन्मान हा अधिकाऱ्यांनी राखलाच पाहिजे असे महापालिका सभागृहात सांगत महापौरांनी प्रशासनाचे कान टोचले.

मुंबई महापालिका सभागृहात शिवसेनेच्या नगरसेविका अपेक्षा खांडेकर यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे आपल्या प्रभागातील नाल्याची सफाईचे काम अद्याप पूर्ण झालेले असून दुसऱ्या प्रभागातील काढलेला गाळ आपल्या प्रभागात आणून टाकला जात असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही ते कंत्राटदाराला सांगून हा गाळ उचलण्याची कोणतीही कार्यवाही करत नसून ८० टक्के झोपडपट्टी परिसरत असलेल्या माझ्या या प्रभागात मी जर नालेसफाईच्या कामांसाठी प्रयत्न करत राहू तर इतर कामे करणार कधी असा संतप्त सवाल केला.

याला शिवसेनेच्या नगरसेविका निर्मिती कानडे यांनी पाठिंबा देताना आपल्या प्रभागात नाल्यातील गााळ काढून ठेवला आहे पण तो ६ ते ७ दिवस झाले तरी उचलत नाही. तसेच यापूर्वी काढलेला गाळ तिथेच असून त्यावर आता आणखी नवीन गाळ जमा केला आहे. पण जुना गाळ आपण नेणार नाही असेही सांगत आहेत. आम्ही नविन नगरसेवक असल्यामुळे अधिकारी ही उडवाउडवीची उत्तरे देत असून आमदार पराग शाह यांनी घेतलेल्या बैठकीत मी हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला तो उपायुक्तांनी हात दाखवून तुम्ही थांबा असे निर्देश करत मला बोलू दिले नाही असे सांगितले. त्यामुळे आम्ही कामे करायची नाही का असा सवाल केला.

यावर सभागृहनेते गणेश खणकर यांनी सभागृहात असो कुठल्याही समितीच्या बैठकीमध्ये नगरसेवकाने जर विभागातील मुद्दा उपस्थित केला तर काही तासांमध्ये तो मुद्दा जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांचे फोन जायला आणि त्या मुद्दयाचे निरसन व्हायला पाहिजे असे सांगितले. पाठिंबा देताना भाजपचे प्रकाश दरेकर यांनी मुंबईच्या प्रवेशद्वाराजवळ कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून महापालिकेचे तिथे लक्ष नाही. पावसाळा कधीही येईल. पण आपली ही कामे कागदावर नको तर प्रत्यक्षात दिसली पाहिजे असा इशारा दिला. तर सध्या नव्याने बनवलेल्या रस्त्यांलगतच्या पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सिमेंट अडकलेले असून या पर्जन्य जलवाहिनी कशा साफ करणार असा सवाल उपस्थित केला तर स्वप्ना म्हात्रे यांनी काढलेला गाळ रस्त्यावर १५ दिवसांपासून पडलेला आहे. तो पुन्हा पसरुन दुर्गंधी पसरते, आणि रोगराई पसरते. मग काढलेला कचरा उचलण्याची ही पध्दत कधी बदलणार असा सवाल केला. यावेळी किशोरी पेडणेकर, अश्रफ आझमी, यामिनी जाधव, प्रविण मोरजकर, नवनाथ बन, मानसी सातमकर,भास्कर शेट्टी आणि अमेय घोले यांनी याला पाठिंबा देत आपल्या विभागातील नालेसफाईच्या कामांची व्यथा मांडली. यावेळी ही बाब गंभीर असल्याचे सांगत महापौर रितू तावडे यांनी सर्व नगरसेवकांनी मांडलेल्या मुद्दयांचा माहितीचा अहवाल पुढील महापालिका सभेत सादर करावा असे निर्देश देत हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.

Comments
Add Comment