कोलकाता : पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक विजयानंतर आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका आगळ्यावेगळ्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. व्यासपीठावर आगमन होताच पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) थेट भारतीय जनता पक्षाचे ९२ वर्षीय दिग्गज आणि अत्यंत जुने कार्यकर्ते माखनलाल सरकार (Makhanlal Sarkar) यांच्या दिशेने पावले वळवली. मोदींनी अत्यंत नम्रपणे खाली वाकून त्यांच्या पायांना स्पर्श करत त्यांचे आशीर्वाद घेतले. केवळ नमस्कार करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी या वयोवृद्ध नेत्याला शाल पांघरून सन्मानित केले आणि अत्यंत प्रेमाने आलिंगन दिले. या अनपेक्षित आणि हृदयस्पर्शी कृतीमुळे उपस्थित सर्वजण भारावून गेले. माखनलाल सरकार हे केवळ एक साधे कार्यकर्ते नसून, त्यांनी थेट जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी (Shyamprasad Mukharjee) यांच्यासोबत काश्मीर आंदोलनात तुरुंगवास भोगला आहे. मोदींनी दिलेला हा सन्मान त्यांच्या याच प्रदीर्घ आणि निस्वार्थ योगदानाला दिलेली पोचपावती मानली जात आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासातील एक सुवर्णपान आज पलटले गेले. कोलकाता येथील ऐतिहासिक 'ब्रिगेड परेड मैदाना'वर हजारो कार्यकर्त्यांच्या ...
कोण आहेत माखनलाल सरकार?
View this post on Instagram
पश्चिम बंगालमधील भाजपचे अत्यंत जुने, अनुभवी आणि आदरणीय कार्यकर्ते माखनलाल सरकार हे वयाची ९२ वर्षे पूर्ण करूनही पक्षात तितक्याच उत्साहाने सक्रिय असणारे एक अखंड निष्ठेचे प्रतीक आहेत. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित होऊन भाजपची मातृसंस्था असलेल्या 'भारतीय जनसंघा'पासून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करणाऱ्या सरकार यांनी आपले संपूर्ण आयुष्य पक्षसंघटनेच्या विस्तारासाठी समर्पित केले. १९५० च्या दशकात जम्मू-काश्मीरमधील 'परमिट' व्यवस्था आणि राज्याच्या स्वतंत्र झेंड्यामुळे निर्माण झालेल्या विषमतेविरुद्ध डॉ. मुखर्जींनी पुकारलेल्या 'एक विधान, एक निशान, एक प्रधान' या ऐतिहासिक लढ्यात त्यांनी तरुण फळीचे खंबीर नेतृत्व केले. याच प्रखर आंदोलनाचा भाग म्हणून, १९५३ साली परवान्याविना काश्मीरमध्ये प्रवेश करण्यासाठी कूच करताना पंजाब आणि जम्मूच्या सीमेवरील माधोपूर येथे डॉ. मुखर्जींसोबत माखनलाल यांनाही अटक करण्यात आली होती. देशाच्या एकात्मतेसाठी आनंदाने तुरुंगवास स्वीकारणाऱ्या आणि तळागाळात काम करणाऱ्या या निष्ठावान शिलेदाराचा जनसंघापासून ते आजच्या भाजपपर्यंतचा हा प्रवास खऱ्या अर्थाने अत्यंत रंजक आणि सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकाल - २०२६
भारतीय जनता पक्ष (BJP): २०७ जागा (निर्विविवाद बहुमतासह ऐतिहासिक विजय)
तृणमूल काँग्रेस (TMC): ८० जागा (१५ वर्षांची सत्ता गमावून मोठा धक्का)
राष्ट्रीय काँग्रेस: ०२ जागा
डावे पक्ष (Left): ०२ जागा
इतर: ०२ जागा
एकूण जागा: २९३





