कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासातील एक सुवर्णपान आज पलटले गेले. कोलकाता येथील ऐतिहासिक 'ब्रिगेड परेड मैदाना'वर हजारो कार्यकर्त्यांच्या अथांग जनसागराच्या साक्षीत शुभेंदू अधिकारी यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या अभूतपूर्व आणि भव्य शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह 'एनडीए'च्या अनेक दिग्गज नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्रातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनीही आवर्जून हजेरी लावली होती. सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी मंचावर उपस्थित असलेल्या सर्वच राज्यांतील आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची अत्यंत आस्थेने भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.
कोलकाता : पश्चिम बंगालचे राज्यपाल आर. एन. रवी (R.N. Ravi) यांनी आज सकाळी ११ वाजता शुभेंदू अधिकारी यांना मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. हा भव्य ...
पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदेंच्या दिलखुलास गप्पांनी वेधले सर्वांचे लक्ष
View this post on Instagram
मंचावर अनेक राज्यांचे दिग्गज नेते उपस्थित असले तरी, राजकीय वर्तुळाच्या आणि प्रसारमाध्यमांच्या नजरा खिळल्या त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर! मोदी मंचावरील इतर नेत्यांची औपचारिक भेट घेत पुढे जात असताना, एकनाथ शिंदे यांच्याजवळ ते अधिक वेळ थांबल्याचे पाहायला मिळाले. दोघांमध्ये अत्यंत जिव्हाळ्याने हस्तांदोलन झाले आणि काहीतरी दिलखुलास गप्पा रंगल्या. मोदींच्या एका वाक्यावर एकनाथ शिंदे खळखळून हसताना दिसले. मंचावरील या दोघांच्या अप्रतिम 'केमिस्ट्री'चा आणि हास्यकल्लोळाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या आनंदोत्सवाला शुभेंदू अधिकारी यांच्या ऐतिहासिक विजयाची किनार आहे. अधिकारी यांनी यंदा नंदीग्राम आणि खुद्द माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला असलेल्या 'भवानीपूर' अशा दोन्ही मतदारसंघांतून दणदणीत विजय मिळवला. २०२१ प्रमाणेच यंदाही त्यांनी ममतादीदींना थेट पराभवाची धूळ चारून आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
विद्यार्थी नेता ते राज्याचे मुख्यमंत्री
१५ डिसेंबर १९७० रोजी पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील कांती येथे जन्मलेल्या शुभेंदू अधिकारी यांचा विद्यार्थी नेता ते राज्याचे मुख्यमंत्री हा राजकीय प्रवास अत्यंत संघर्षमय आणि थक्क करणारा राहिला आहे. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी चळवळीतून सार्वजनिक जीवनात पाऊल ठेवलेल्या अधिकारी यांनी आपल्या कारकिर्दीची अनेक वर्षे तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) व्यतीत केली. २००७ च्या ऐतिहासिक 'नंदीग्राम आंदोलना'तील त्यांच्या आक्रमक नेतृत्वाने त्यांना देशपातळीवर मोठी ओळख मिळवून दिली, ज्याच्या जोरावर ते २००९ मध्ये पहिल्यांदा खासदार आणि २०१६ मध्ये नंदीग्राममधून आमदार म्हणून निवडून आले. मात्र, २०२० मध्ये त्यांनी ममतादीदींशी आणि तृणमूलशी फारकत घेत राजकीय दिशा बदलली आणि अधिकृतपणे भाजपचा (BJP) झेंडा हाती घेतला. या पक्षांतराचा सर्वात मोठा धक्का त्यांनी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत दिला, जेव्हा नंदीग्राममध्ये खुद्द ममता बॅनर्जींचा पराभव करून ते देशाच्या राजकारणात 'जायंट किलर' ठरले. याच यशाची आणि संघर्षाची मालिका पुढे नेत आता २०२६ मध्ये ते थेट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले असून, त्यांच्या या रंजक वाटचालीवर एका ऐतिहासिक यशाचे शिक्कामोर्तब झाले आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकाल - २०२६
भारतीय जनता पक्ष (BJP): २०७ जागा (निर्विविवाद बहुमतासह ऐतिहासिक विजय)
तृणमूल काँग्रेस (TMC): ८० जागा (१५ वर्षांची सत्ता गमावून मोठा धक्का)
राष्ट्रीय काँग्रेस: ०२ जागा
डावे पक्ष (Left): ०२ जागा
इतर: ०२ जागा
एकूण जागा: २९३





