DRDO News : भारताची संरक्षण क्षेत्रात मोठी झेप! ओडिशात स्वदेशी ‘TARA’ ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी
May 8, 2026 06:50 PM
DRDO
ओडिशा : ओडिशाच्या किनारपट्टीवर भारताने संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. Defence Research and Development Organisation (डीआरडीओ) आणि भारतीय हवाई दल (Indian Air Force) यांनी संयुक्तपणे टॅक्टिकल ॲडव्हान्स्ड रेंज ऑगमेंटेशन अर्थात ‘टीएआरए’ (TARA) शस्त्र प्रणालीची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी पार पाडली. ही भारताची पहिली स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणाली मानली जात असून, पारंपरिक नियंत्रण प्रणाली नसलेल्या स्फोटकांना अत्यंत अचूक लक्ष्यभेदी शस्त्रांमध्ये रूपांतरित करण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी या यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओ, भारतीय हवाई दल आणि उद्योग क्षेत्राचे अभिनंदन केले. “भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतांना बळकटी देणारे हे एक ऐतिहासिक पाऊल आहे,” असे ते म्हणाले.
दरम्यान, संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव तसेच डीआरडीओचे अध्यक्ष समीर कामत (Samir V. Kamat) यांनीही या मोहिमेत सहभागी सर्व वैज्ञानिक, अभियंते आणि तांत्रिक पथकांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, भविष्यात भारतीय सैन्याच्या ऑपरेशनल क्षमतांमध्ये ही प्रणाली मोठी भर घालणार आहे.