Wednesday, May 6, 2026

West Bengal Election 2026 : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार उसळला; निवडणूक आयोगाचा कडक इशारा

West Bengal Election 2026 : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार उसळला; निवडणूक आयोगाचा कडक इशारा

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटना घडत असल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. या पार्श्वभूमीवर आता भारत निवडणूक आयोगाने कठोर भूमिका घेत संबंधित यंत्रणांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, हिंसाचारात सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही आणि दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

दरम्यान, कोलकात्यातील न्यूटाउन परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने वातावरण आणखी चिघळले आहे. भाजप कार्यकर्ता मधु मंडल यांची मारहाण करून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि मृताच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत जोरदार निषेध आंदोलन केले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, ज्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.

राज्यातील विविध जिल्ह्यांमधून हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोडीच्या तक्रारी सतत येत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, कोलकाता पोलीस आयुक्त तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचे महासंचालक यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

याशिवाय, सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना सतत गस्त घालण्याचे आणि संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत असून, गरज भासल्यास आणखी केंद्रीय दलांची मदत घेतली जाणार आहे.

निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, निवडणुकीनंतर होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराविरुद्ध ‘शून्य सहनशीलता’ धोरण राबवले जाईल. लोकशाही प्रक्रियेनंतर अशा प्रकारच्या घटनांना कोणतीही जागा नसल्याचेही आयोगाने ठामपणे नमूद केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >