Sunday, August 16, 2026

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या जलवाहिनीतून ठाण्याच्या तीन हात नाका परिसरात गळती सुरू असल्याचे गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ रोजी लक्षात आले होते. महापालिकेने युद्धपातळीवर दुरुस्तीला सुरुवात केली. अखेर स्वातंत्र्यदिनी संध्याकाळी पाच वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. यामुळे मुंबईकरांसाठी आता जलाशयांमध्ये किती पाणीसाठी आहे असा प्रश्न अनेकांना सतावत होता. या पार्श्वभूमीवर एक दिलासा देणारी बातमी आली आहे. पाणी गळती सुरू होती त्याच सुमारास पडलेल्या पावसामुळे पाणी पातळी सावरण्यास मदत झाली आहे. आता जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर नंतर गळती पण थांबली आहे, त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये ९२.२४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

मुंबईला सात धरणांमधून पाणीपुरवठा होतो. या धरणांच्या जलाशयांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. सध्या जलाशयांमध्ये एकूण १३ लाख ३४ हजार ९७९ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. यामुळे टप्प्याटप्प्याने मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू झाले आहे. विहार, तुळशी आणि मोडक सागर ओसंडून वाहत आहे तर अप्पर वैतरणा या मोठ्या धरणात ८३.२० टक्के उपयुक्त जलसाठा आहे. तानसातील उपयुक्त जलसाठ्याचे प्रमाण ९९.२६ टक्क्यांवर आले आहे. मध्य वैतरणातील उपयुक्त जलसाठ्याचे प्रमाण ९६.९५ टक्के आहे तर भातसामध्ये ९०.६२ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

मुंबई ३ या जलवाहिनीचा मोठा भाग भूमिगत असल्यामुळे दुरुस्तीचे काम कठीण होते. पण तंत्रज्ञांनी हे आव्हान पेलले. अखेर स्वातंत्र्यदिनी संध्याकाळी पाच वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण केले. महानगरपालिका जल कार्य (नगरबाह्य) विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून जलवाहिनीवरील छिद्र लाकडी खुंटी बसवून बंद केले. दुरुस्तीचे काम सुरू असताना क्षतिग्रस्त जलवाहिनीच्या भागाभोवतीचा परिसर खोदकाम करून उघडण्यात आला. तेथील साचलेले पाणी उपसून परिसर कोरडा करण्यात आला. खराब झालेल्या भागावर मृदू पोलाद (MS) पॅच प्लेट बसवून ती वेल्डिंगद्वारे कायमस्वरूपी दुरुस्त करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री जलवाहिनीला पुन्हा एकदा गळती लागली. पाण्याच्या प्रचंड दाबामुळे दुरुस्ती कार्यवाहीत अडथळे निर्माण झाले. परिणामी, शहर व पूर्व उपनगरातील पाणीपुरवठा प्रभावित झाला.

अखेरीस, पिसे उदंचन केंद्र व पांजरापूर जल शुद्धीकरण प्रकल्प यांच्यासमवेत समन्वय साधून पाणीपुरवठ्यावर नियंत्रण आणण्यात आले. क्षतिग्रस्त दाबयुक्त जलवाहिनीची सुरक्षितपणे दुरुस्ती करण्यात आली. जल कार्य (नगरबाह्य) विभागाचे अभियंते आणि कर्मचारी यांच्या चमूने गळती दुरुस्ती कार्यवाही स्वातंत्र्यदिनी संध्याकाळी पाच वाजता युद्धपातळीवर पूर्ण केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >