Beed Crime : बीडमध्ये एक थरारक घटना समोर आली आहे. बाप की हैवान असा प्रश्न पडावा अशी ही घटना. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. माजलगावमधील लहामेवाडी येथे पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून एका निर्दयी पित्याने स्वतःच्याच दोन पोटच्या मुलींच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय. महेश सोमासे असे आरोपी पित्याचे नाव आहे.
ऑनलाइन सट्ट्याच्या नादात महेशने ५ एकर जमीन गमावली
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, २०१९ मध्ये पीडित अश्विनी सोमासे यांचा विवाह महेश सोमासे याच्याशी झाला होता. सुरुवातीची दोन-तीन वर्षे सुखात गेले मात्र नंतर महेशला ऑनलाइन सट्ट्याचा नाद लागला. नाद एवढा की या नादात त्याने घराची पाच एकर शेती गमावलीच पण उरलेली सात एकर जमीन आपल्या नावावर करण्यासाठी पत्नीकडे तगादा लावला. एवढ्यावरच तो थांबला नाही तर पत्नीला माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावत त्याने तिला मारहाण करायला देखील सुरुवात केली. या छळाला कंटाळून अखेर अश्विनी आपल्या दोन मुलींसह माहेरी लहामेवाडीत रहायला आल्या.
घटनेच्या दिवशी काय घडलं ?
२ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास महेश सोमासे दुचाकीवरून लहामेवाडीत सासरच्या घरी पोहोचला. पत्नीला 'नांदायला चल' म्हणत त्याने अश्विनीला धमकावण्यास सुरुवात केली. पत्नीने जाण्यास नकार दिला, तेव्हा महेशचा राग अनावर झाला. धक्कादायक म्हणजे आपल्यासोबत आणलेले डिझेल दोन्ही लहान मुलींच्या अंगावर ओतले आणि त्यांना पेटवून देण्याचा त्याने प्रयत्न केला. हे पाहताच मुलींच्या आजी-आजोबांनी आणि शेजाऱ्यांनी आरडाओरडा करत मुलींना बाजूला ओढले, ज्यामुळे सुदैवाने चिमुकल्या मुलींचे प्राण वाचले.
तो उद्या आमच्या लेकीचं काय करेल ?
"जो स्वतःच्या पोटच्या पोरींना जिवंत जाळायला निघाला, तो उद्या आमच्या लेकीचं काय करेल?" असा टाहो फोडत पीडितेच्या आई-वडिलांनी न्यायाची मागणी केली आहे. ऑनलाइन गेम आणि सट्ट्यामुळे एका हसत्या-खेळत्या संसाराची राखरांगोळी झाली असून, आता आरोपी पित्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.






