Monday, May 4, 2026

Narendra Modi : बंगाल, आसाम, पद्दुचेरीतील विजय हा मोदींवरील विश्वासाचा विजय

Narendra Modi : बंगाल, आसाम, पद्दुचेरीतील विजय हा मोदींवरील विश्वासाचा विजय

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; आज भाजप नव्हे, संपूर्ण भारत जिंकला

मुंबई : पश्चिम बंगाल, आसाम, पद्दुचेरीमध्ये भाजपचा झालेला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केली. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये झालेले परिवर्तन हे 'महापरिवर्तन' असल्याचे सांगत, "आज भाजप नव्हे, तर संपूर्ण भारत जिंकला आहे," असे प्रतिपादन त्यांनी भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित विजयोत्सवात केले.

नरिमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत रसगुल्ले वाटून विजयोत्सव साजरा केला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. निवडणूक प्रचारातील आठवणींना उजाळा देताना मुख्यमंत्री म्हणाले, "मी जेव्हा बंगालमध्ये गेलो होतो, तेव्हा एका पत्रकाराने विचारले होते की, ममता बॅनर्जी भाजपला बाहेरील पक्ष म्हणतात. त्यावर मी त्यांना स्पष्ट केले की, ज्यांनी भाजपची निर्मिती केली, ते श्यामाप्रसाद मुखर्जी बंगालचेच सुपुत्र होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने बंगालचा जर कुठला पक्ष असेल, तर तो भारतीय जनता पक्षच आहे."

पश्चिम बंगालमधील ३० वर्षांचे काँग्रेसचे, ३६ वर्षांचे कम्युनिस्टांचे आणि १५ वर्षांच्या ममता बॅनर्जी यांच्या शासन काळावर मुख्यमंत्र्यांनी कडाडून टीका केली. देशाची आर्थिक ताकद असलेला बंगाल या राजवटींमध्ये मागे पडला आणि तिथे जंगलराज निर्माण झाले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या विकासाच्या व्हिजनमुळे बंगालच्या जनतेने परिवर्तन नव्हे, तर 'महापरिवर्तन' घडवून आणले, असेही त्यांनी सांगितले.

बंगालचा विजय आंतरिक सुरक्षेसाठी महत्त्वाचा

फडणवीस म्हणाले की, आसाममध्ये भाजपचे सरकार आल्यापासून आतंकवादी कारवायांना आळा बसला असून, एकट्या भाजपला तिथे स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तसेच, बंगालचा विजय हा देशातील घुसखोरी आणि अंतर्गत हल्ल्यांपासून देशाला सुरक्षित ठेवणारा विजय आहे. ममतादीदींनी कितीही अत्याचार केले, डोळे फोडले तरीही भाजपचा कार्यकर्ता थांबणार नाही, हे या विजयाने दाखवून दिले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राष्ट्रीयत्त्वाचा विजय - रवींद्र चव्हाण

या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या परिश्रामाचे कौतुक केले. महाराष्ट्रातील जवळपास ६ हजार बंगाली कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन रात्रंदिवस प्रचार केला, असे नमूद करत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मिळालेला हा विजय राष्ट्रीयत्त्वाचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले. 'मोदी है तो मुमकिन है' या घोषणेचा पुनरुच्चार करत त्यांनी संपूर्ण देशभरातील कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

लाचार राज्यकर्त्यांना चपराक - राधाकृष्ण विखे पाटील

पश्चिम बंगालमधील जंगलराज आणि घुसखोरीमुळे देशाला अंतर्गत धोका निर्माण झाला होता. ठराविक समाजाच्या मतांसाठी लाचार झालेल्या ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालच्या जनतेने या निवडणुकीतून चांगलीच चपराक दिली आहे, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विजयानंतर दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा