Thursday, June 11, 2026

BMC : शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये आता सिविक सेन्स विकसित करण्यावर दिला जाणार भर

BMC : शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये आता सिविक सेन्स विकसित करण्यावर दिला जाणार भर

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे शिक्षण विभागाला निर्देश

मुंबई : शाळांचा भौतिक दर्जा उंचावा म्‍हणून सहायक आयुक्‍तांनी आपापल्‍या विभागातील शाळांना नियमितपणे भेटी द्याव्‍यात. स्‍थानिक पातळीवर किरकोळ देखभाल - दुरूस्‍तीची कामे करावीत. शाळांबाहेर अनधिकृत पार्कींग होऊ नये, यासाठी जनजागृती करावी. शैक्षणिक वर्ष सुरू होताना शाळा प्रवेशोत्‍सव उपक्रम राबविला जातो, त्‍यास सहायक आयुक्‍त, उपायुक्‍त यांनी समक्ष हजर रहावे, असे निर्देश भिडे यांनी दिले. तसेच द्यार्थ्यांमध्ये नागरिक भान (सिविक सेन्स) विकसित होणे आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शाळेपासूनच विद्यार्थ्यांना स्वच्छता, शिस्त, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण, वाहतूक नियमांचे पालन आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या मूल्यांचे शिक्षण दिले जावे,असेही निर्देश त्यांनी दिले.

मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांची मासिक आढावा बैठक गुरुवारी ११ जून २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. त्यावेळी श्रीमती भिडे बोलत होत्या. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (दक्षता) डॉ. एम. देवेंदर सिंह, सह पोलिस आयुक्‍त (वाहतूक) सत्‍य नारायण चौधरी, उपायुक्‍त (महानगरपालिका आयुक्‍त कार्यालय) प्रशांत गायकवाड यावेळी उपस्थित होते. तसेच, सर्व सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त, खाते प्रमुख यांचीदेखील या बैठकीस उपस्थिती होती.

शिक्षण विभागाचा आढावा घेताना आाश्विनी भिडे म्‍हणाल्‍या की, मुंबईच्या शिक्षण व्यवस्थेत महानगरपालिका शाळांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. अलीकडील काळात महानगरपालिका शाळांच्या शैक्षणिक निकालांमध्ये सुधारणा झाली आहे. महानगरपालिकेच्या शाळा केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमापुरत्या मर्यादित नाहीत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तंत्रज्ञानाधारित शिक्षण, क्रीडा, कला आणि सामाजिक-जागरूकता कार्यक्रमही राबवितात. विद्यार्थ्यांमध्ये नागरिक भान (सिविक सेन्स) विकसित होणे आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शाळेपासूनच विद्यार्थ्यांना स्वच्छता, शिस्त, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण, वाहतूक नियमांचे पालन आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या मूल्यांचे शिक्षण दिले पाहिजे.

महानगरपालिका प्रशासनाची कार्यपद्धती, दैनंदिन पाणीपुरवठा - पाण्‍याचा वापर, कचरा संकलन व विल्‍हेवाट, उदंचन प्रक्रिया, अग्निशमन यंत्रणांची माहिती विद्यार्थ्‍यांना दिली पाहिजे. यामुळे त्यांच्यामध्ये समाजाप्रती कर्तव्य भावना निर्माण होते. तसेच इतरांना मदत करणे, सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणे, विविधतेचा आदर करणे आणि जबाबदार नागरिक म्हणून वागणे याची सवय लागते. सिव्हिक सेन्स आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव असलेले विद्यार्थी भविष्यात सुजाण, संवेदनशील आणि आदर्श नागरिक बनून राष्ट्राच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देतात. यासाठी महानगरपालिकेच्‍या शिक्षण विभागाने स्‍वत:ची मार्गदर्शन तथा व्‍यवसाय पुस्तिका काढावी, अशी महत्‍त्‍वपूर्ण सूचना आश्विनी भिडे यांनी केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >