Hyderabad : हैदराबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 36 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने 19 पानांची एक ह्रदयद्रावक सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. सीताराम असे मृत व्यक्तीचे नाव असून, हुसेन सागर तलावात उडी मारून त्याने आपले आयुष्य संपवले आहे. या सुसाईड नोट मध्ये त्याने आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, सीतारामच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत, सीतारामने आपल्या पत्नीचे तीन पुरुषांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला असून, हेच आपल्या मृत्यूचे कारण असल्याचे म्हटले आहे. पोलिसांच्या तपासात असे उघड झाले आहे की, सीतारामने २०१८ मध्ये नांद्याल येथील एका महिलेशी लग्न केले होते. ते हैदराबादमध्ये राहत होते. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी आणि इतर पुराव्यांच्या आधारे, पोलिसांनी सीतारामच्या पत्नीसह तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
ह्रदयद्रावक सुसाईड नोट समोर
सीतारामने सुसाईड नोटमध्ये पत्नी, रेणुकावर, गेल्या दीड वर्षात तीन वेगवेगळ्या पुरुषांशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. त्याने लिहिले आहे की, यातील एका व्यक्तीने रेणुकासोबतचे खाजगी क्षण रेकॉर्ड केले होते आणि रमणा नावाच्या एका इंस्टाग्रामवर अकाऊंटवरुन ते व्हिडिओ व्हायरल केले. विशेष म्हणजे, आपल्या पत्नीचे असे व्हिडिओ ऑनलाइन पाहिल्यानंतरच आपल्याला या प्रकरणाची माहिती मिळाली, ज्यामुळे आपल्याला प्रचंड मानसिक धक्का बसला, असे सीतारामने पत्रात नमूद केले आहे.
मृत सीतारामने आपल्या भावना व्यक्त करताना पत्रात लिहिले आहे की, त्याने पत्नीची नेहमी काळजी घेतली आणि तिला सर्व सोयीसुविधा पुरवल्या, मात्र तिच्याकडून मिळालेल्या विश्वासघातामुळे तो पूर्णपणे खचून गेला होता. त्याने असाही आरोप केला की, तो घरी नसताना संबंधित व्यक्ती अनेकदा त्याच्या घरी येत असे. या सर्व प्रकारामुळे उद्भवलेल्या कौटुंबिक कलहातून आणि मानसिक त्रासातून मुक्त होण्यासाठी त्याने मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतला.
याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सीतारामच्या पत्नीसह तीन जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ती 19 पानांची सुसाईड नोट ताब्यात घेतली असून तिची सत्यता पडताळली जात आहे. पत्नीचे कथित प्रेमसंबंध आणि खासगी व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या आरोपांची सखोल चौकशी केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या तपासातून नेमके काय सत्य समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सीतारामच्या आत्महत्येने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.






