यंदाचा उन्हाळा केवळ घामाच्या धारा काढणारा नसून अंगाची लाहीलाही करणारा आणि जीवघेणा ठरू लागला आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देश सध्या एका भीषण नैसर्गिक संकटाचा सामना करत असून, तापमानाने चाळिशी केव्हाच ओलांडून आता ४७ अंशांच्या दिशेने कूच केली आहे.
महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील काही भागांतील नागरिकांना एका भीषण नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक राज्यांमध्ये तापमानाचा उच्चांक पाहायला मिळत असून, नागरिक निसर्गाच्या अत्यंत दाहक आणि भीषण संकटाशी सामना करत आहेत. वैशाख वणव्याची दाहकता एप्रिलमध्येच जाणवू लागली असून, ४५ अंशांच्या पार गेलेल्या तापमानामुळे आभाळातून पावसाऐवजी आगीच्या ज्वाळाच खाली येत आहेत की काय, अशी भीषण स्थिती निर्माण झाली आहे.
उत्तर प्रदेशातील बांदा येथे देशातील सर्वाधिक ४७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, उन्हाच्या तडाख्याने सीमा ओलांडली आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि मध्य प्रदेशासह पूर्व भारतातील पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडमध्येही सूर्याचा प्रकोप जाणवत आहे. दक्षिण भारतात तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात उष्णतेच्या लाटेने धोक्याची पातळी ओलांडली. ओडिशामध्येही उष्णतेने उच्चांक गाठला आहे. दुसऱ्या बाजूला जम्मू-काश्मीरसारख्या थंड प्रदेशातही तापमानाचा पारा चढलेला दिसत असून, ही स्थिती काळजाचा ठोका चुकवणारी आहे. राज्यात नेहमीप्रमाणे विदर्भातील अकोला, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांत उष्णतेने कहर आहे. विशेषतः अकोल्याचा पारा ४६.९ अंशांवर पोहोचल्याने हे शहर उष्ण शहरांच्या यादीत स्थान वरच्या स्थानी आहे. केवळ विदर्भच नव्हे, तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही उष्णतेच्या लाटेने नागरिकांची लाहीलाही होत आहे. उष्णतेच्या लाटांचा भूगोल आता वेगाने बदलत असून, उत्तर भारताकडून ही आग मध्य आणि दक्षिण भारताकडे सरकली आहे. अगदी हिमालयाच्या कुशीतील जम्मू-काश्मीरही या आगीतून सुटलेले नाही. ही उष्णता आता केवळ घामाच्या धारा काढणारी उरली नसून ती थेट जीव घेण्यावर टपली आहे. परभणीपासून हिंगोलीपर्यंत आणि नगरपासून नागपूरपर्यंत सात-आठ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. शेतात राबणारा शेतकरी आणि कामासाठी पायपीट करणारा कष्टकरी आज या निसर्गनिर्मित संकटाचा बळी पडत आहे, हे विदारक सत्य आहे. पर्यावरण शास्त्रज्ञांच्या मते, ही दाहकता केवळ ऋतुचक्राचा भाग नसून 'हवामान बदलाचा' एक धोक्याचा इशारा आहे. वाढते सिमेंटचे जंगल आणि बेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळला असून, जागतिक तापमान वाढीमुळे उष्णतेच्या लाटांची वारंवारता आणि तीव्रता दोन्ही आता नियंत्रणाबाहेर गेल्या आहेत. पूर्वी मे महिन्यात जाणवणारे उन्हाचे चटके आता मार्च-एप्रिलमध्येच अंगाची लाहीलाही करत आहेत. मार्च महिन्यातच तापमानाचा पारा ४० अंशांच्या पार जाणे, ही धोक्याची घंटा मानली जात होती. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तर अनेक ठिकाणी तापमान ४७ - ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. ज्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
वाढत्या धोक्यामुळे सरकारकडून अनेक जिल्ह्यांत 'येलो अलर्ट' जारी केला आहे. उष्माघात हा या हवामान बदलाचा सर्वात घातक परिणाम आहे. वाढत्या उष्णतेमुळे शरीराची तापमान नियंत्रण प्रणाली कोलमडते, ज्यामुळे गंभीर आजार किंवा मृत्यू ओढवू शकतो. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या दशकात देशात उष्णतेमुळे हजारो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शेतमजूर, बांधकाम कामगार आणि रस्त्यावरील विक्रेते यांसारख्या उघड्यावर काम करणाऱ्या वर्गाला याचा सर्वाधिक फटका बसत आहे. उष्णतेचे हे संकट केवळ आरोग्यापुरते मर्यादित नाही. कडक उन्हामुळे शेतीतील पिकांचे नुकसान होत आहे, ज्यामुळे अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होतोय. तसेच, वाढत्या वीज वापरामुळे ऊर्जेची टंचाई निर्माण होऊन वीज कपात करावी लागत आहे. 'श्रम उत्पादकता' कमी झाल्यामुळे देशाच्या जीडीपीवरही याचा नकारात्मक परिणाम होत असल्याचे जागतिक अहवाल सांगतात. उष्णतेमुळे पिकांवर ताण येतो आणि पाण्याची मागणी वाढते. हिमालयातील बर्फ वितळण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे नद्यांच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम होत आहे. राज्यातील विदर्भात, विशेषतः अकोला येथे तापमान ४६.९° सेल्शिअसवर गेल्याने सध्या विदर्भ हा उष्माघाताचा 'हॉटस्पॉट' ठरला आहे. महाराष्ट्रात २०२६ च्या उन्हाळ्यात आतापर्यंत उष्माघातामुळे ७ ते ८ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. परभणीत ३७ वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला असून, अहिल्यानगरात ४५ वर्षीय महिला शेतकरी शेतात काम करताना दगावली. नागपूर जिल्ह्यात बसने प्रवास करणाऱ्या ६५ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला, अशी उदाहरणे देता येतील. उष्णतेच्या लाटांमुळे शरीरातील पाणी कमी होणे (डिहायड्रेशन), उष्माघात आणि मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत स्वतःची काळजी घेणे, मुक्या प्राण्यांसाठी पाण्याची सोय करणे आणि ऊन टाळून कामे करणे, हेच आपल्या हातात आहे. आरोग्य विभागाने दुपारी घराबाहेर न पडण्याचे, सुती कपडे वापरण्याचे आणि भरपूर पाणी पिण्याचे आवाहन केले आहे. मात्र, केवळ तात्पुरत्या उपाययोजनांनी हे संकट टळणारे नाही, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. जागतिक तापमान वाढीमुळे पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत आहे, ज्याचा थेट परिणाम भारताच्या उन्हाळ्यावर होत आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत असल्याने अनेक शहरात 'अघोषित संचारबंदी' अनुभवला मिळत आहे. पॅसिफिक महासागरातील पाण्याच्या तापमानातील बदलांमुळे मान्सूनवर परिणाम होऊन उष्णतेची तीव्रता वाढली आहे. उष्माघाताचे संकट हे निसर्गाचे एक प्रकारची प्रतिक्रिया आहे. आपण निसर्गाचा जो समतोल बिघडवला आहे, त्याचे परिणाम आता आपण भोगत आहोत. जर आपण आताच कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि निसर्ग संवर्धनाकडे लक्ष दिले नाही, तर भविष्यातील पिढ्यांसाठी हा उन्हाळा अधिक असह्य आणि प्राणघातक ठरेल.