विधान परिषदेत चुरस वाढली

सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीचे चित्र गेल्या काही दिवसांपासून अपेक्षेप्रमाणे एकतर्फी वाटत होते. मात्र महाविकास आघाडीने ऐनवेळी उमेदवार बदलत साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते अभयासिंह जगताप यांना रिंगणात उतरवल्याने या निवडणुकीला अचानक रंगत आणि चुरस निर्माण झाली. या घडामोडीमुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडून आले असून दोन्ही आघाड्यांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.


सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणूक गेल्या काही दिवसांपासून एकतर्फी होणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र महाविकास आघाडीने ऐनवेळी उमेदवार बदलत साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते अभयासिंह जगताप यांना रिंगणात उतरविल्याने निवडणुकीला अचानक चुरस प्राप्त झाली आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या जगताप यांच्या उमेदवारीमुळे महायुतीसमोर नवीन आव्हान उभे राहिले असून दोन्ही बाजूंनी पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीने या मतदारसंघातून धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली आहे. कदम यांना भाजपचे वरिष्ठ नेते व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा पाठिंबा असल्याचे मानले जाते. उमेदवारी अर्ज दाखल करतानाही भाजप व महायुतीतील प्रमुख नेते त्यांच्या सोबत उपस्थित होते.




गेल्या आठवड्यापर्यंत महाविकास आघाडीने ही निवडणूक जवळपास सोडून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. सांगलीचे बाळासाहेब पाटील यांचे नाव पुढे असताना निवडणुकीत विशेष रंगत दिसत नव्हती. मात्र ऐनवेळी उमेदवार बदलून जगताप यांना संधी देण्यात आल्याने राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. विशेषतः सांगली आणि सातारा जिल्ह्यातील महायुतीमधील नाराज गटांना एकत्र आणून अधिकृत उमेदवाराविरोधात मतदान घडवून आणण्याची रणनीती महाविकास आघाडीने आखल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महायुतीतील गळती रोखण्यासाठी थेट मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. सोमवारी त्यांनी भाजपशी संबंधित सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांतील मतदार प्रतिनिधींशी संवाद साधत पक्षनिष्ठेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. वैयक्तिक नाराजी, स्थानिक मतभेद किंवा पाहुणचाराच्या राजकारणाला बळी न पडता महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनाच मतदान व्हावे, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. कोणाचीही नाराजी असेल, तर ती दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करू, मात्र मतदान पक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच झाले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असल्याचे समजते.




महायुतीतील नाराजीचे केंद्र सातारा जिल्ह्यात अधिक असल्याची चर्चा आहे. अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्याशी संपर्क ठेवून त्यांच्याशी संबंधित मतदारांना एकत्र ठेवण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. तसेच शिंदे

"> सेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या नाराजीच्या चर्चांनाही उधाण आले आहे. त्यांच्या नाराजीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना ‘वर्षा’ निवासस्थानी चर्चेसाठी आमंत्रित केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मात्र मतदार प्रतिनिधींनी कोणती भूमिका घ्यायची यावर सक्ती करता येणार नाही, अशी भूमिका देसाई यांनी घेतल्याची चर्चा आहे. महायुतीसमोरील आणखी एक आव्हान म्हणजे गोरे कुटुंबातील कथित नाराजी. धैर्यशील कदम यांना उमेदवारी मिळताना जयकुमार गोरे यांनी पाठपुरावा केल्याची चर्चा असून त्यामुळे शेखर गोरे नाराज असल्याचे बोलले जात आहे. या नाराजीचे परिणाम मतदानावर होतात का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीसाठीदेखील परिस्थिती पूर्णपणे अनुकूल असल्याचे चित्र नाही.



काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटातील काही स्थानिक नेते उघडपणे भाजपविरोधी भूमिका घेण्यास उत्सुक नसल्याचे दिसत आहे. काही नेत्यांचे महायुतीतील प्रभावशाली नेत्यांशी जुने राजकीय संबंध असल्याने मतदानाच्या वेळी ते कोणती भूमिका घेतात, हे निर्णायक ठरू शकते. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकांमध्ये पक्षीय गणितांपेक्षा वैयक्तिक संबंध, स्थानिक समीकरणे आणि नाराज गटांची भूमिका महत्त्वाची ठरत असते. त्यामुळे संख्याबळ एका बाजूला दिसत असले तरी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी चित्र बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच, महाविकास आघाडीने उमेदवार बदलून निवडणुकीत उत्सुकता निर्माण करण्यात पहिल्या टप्प्यात यश मिळवले आहे. मात्र ही चुरस मतदानापर्यंत कायम राहते की महायुती आपले संख्याबळ आणि संघटनशक्तीच्या जोरावर बाजी मारते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सध्या तरी सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचे पारडे नेमके कोणाच्या बाजूने झुकले आहे, याचा ठाम अंदाज बांधणे राजकीय जाणकारांनाही कठीण झाले आहे.

Tags
mahavikasaghadiMahayutielection2026LegislativeCouncilSangliSataraMaharashtraPoliticsMaharashtraLegislativeCouncil
Comments
Add Comment

हरित ऊर्जेसाठी उपयुक्त संशोधन

हवामानबदल आणि जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्वामुळे पर्यावरणीय संकट तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘ग्रीन

शस्त्रसंधीची ऐशी तैशी

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा थेट परिणाम लेबनॉनवरही दिसते. तेथील नागरिकांना विस्थापन,

Monsoon : आभाळ भरून येते, पण पाऊस?

मशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी पेरणीसाठी सज्ज आहे; मात्र आकाशाकडे लागलेल्या नजरा आणि पावसाची अनिश्चितता

एकखांबी शोकांतिका

दोन खंदे सहकारी ज्या कारणावरून सोडून गेले, त्या कारणाबाबत ममता यांनी गंभीर विचार करायला हवा होता. पण असं कोणत्याच

RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षण वर्गाची उत्क्रांती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासूनच शिस्त, शारीरिक बळकटी आणि बौद्धिक घडण यासाठी प्रशिक्षणाला विशेष

PM Swanidhi Yojana : पीएम स्वनिधी योजना: फेरीवाल्यांचे आर्थिक सक्षमीकरण

पीएम स्वनिधी योजना ही फेरीवाल्यांसाठी भारतातील पहिली सर्वसमावेशक सूक्ष्म-कर्ज योजना आहे, जी त्यांना