Wednesday, April 29, 2026

Jai Konkan : भाजपच्या तेजिंदर सिंग तिवानाने महापालिकेत लावला जय कोकणचा नारा

Jai Konkan : भाजपच्या तेजिंदर सिंग तिवानाने महापालिकेत लावला जय कोकणचा नारा

अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात मालवणी भाषेतून

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पिय भाषणात भाजप नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी चक्क मालवणीतून महापौरांचे धन्यवाद मानत जय कोकणचा नारा दिला. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात माका अर्थसंकल्पावर बोलाक दिल्याबद्दल धन्यवाद मानले. तसेच जय कोकणचा नारा दिला.त्यामुळे सभागृहातील विरोधी पक्षातील नगरसेवकांनीही जय कोकणचा नारा देत त्यांना प्रतिसाद दिला. माझी आऊस मालवणी आसा, म्हणून मालवणी भाषा माका आवडता,याचसाठी मी भाषणाची सुरूवात मालवणीतून केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सन २०२६-२७च्या महापालिका अर्थसंकल्पावर चर्चा करताना भाजप नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी हा अर्थसंकल्प मुंबईच्या प्रगतीसाठी दिशादर्शक असून प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शकता आणि जबाबदारी यावर विशेष भर देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. तिवाना यांनी केवळ खर्चाच्या बाजूवर भाष्य न करता महसुलाच्या जमेच्या बाजूकडेही बारकाईने लक्ष वेधले. मालमत्ता कर व्यवस्थेत सुधारणा, अनधिकृत व व्यावसायिक वापरातील मालमत्तांचा शोध आणि करआधार वाढवणे यावर त्यांनी ठोस भूमिका मांडली. मुंबईतील पूरस्थिती, नालेसफाई, कचरा व्यवस्थापन, ई-वेस्ट, वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची गुणवत्ता यांसारख्या मूलभूत समस्यांवर त्यांनी ठोस आणि शाश्वत उपाययोजना सुचवल्या. आरोग्य व शिक्षण क्षेत्रात उपनगरांमध्ये अत्याधुनिक रुग्णालये, ट्रॉमा केअर सेंटर, डिजिटल शिक्षण आणि स्किल डेव्हलपमेंटवर भर देत नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. तिवाना यांनी आपल्या भाषणातून अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीतील त्रुटींवरही स्पष्टपणे भाष्य करत प्रशासनाला कानउघाडणी केली आणि जबाबदारी निश्चित करण्याची गरज अधोरेखित केली. “विकास हा केवळ घोषणांमध्ये नसून तो प्रत्यक्षात दिसला पाहिजे. नियोजन, अंमलबजावणी आणि जबाबदारी या त्रिसूत्रीवर काम केल्यास मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवणे शक्य आहे,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

Comments
Add Comment