मुंबई : "उमेदवारी अर्जासोबत जोडायची कागदपत्रे माझ्या बॅगेतच आहेत. जर शिवसेनेने सन्मानाने उमेदवारी दिली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाईक म्हणून काम करण्याची माझी तयारी आहे", अशी भूमिका माजी मंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी स्पष्ट केली.
प्रहार पक्षाचे शिवसेनेत विलीनीकरण होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याने कडू यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “पदासाठी युती करणारा बच्चू कडू नाही, तर मुद्द्यांसाठी युती करणारा कार्यकर्ता आहे. केवळ आमदारकी मिळवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष विलीन करेल, इतका मी नालायक नाही.”
१९९९ मध्ये स्थापन झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाने नेहमीच आक्रमक आंदोलनांची भूमिका घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाच्या वेळी बच्चू कडू सुरुवातीला त्यांच्यासोबत होते. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वतंत्र चूल मांडण्याचा निर्णय घेतला. त्या निवडणुकीत ३८ जागा लढवूनही यश मिळाले नसले तरी, प्रहारला दीड टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती. आता विधान परिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा शिंदे गट आणि कडू यांच्यात जवळीक निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.