बीड : दीड वर्षांपूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्राच राजकारणं ढवळून निघालं होतं. 9 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत क्रूर पद्धतीने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्याच मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या निधनामुळे सरंपचपदासाठी पोटनिवडणूक झाली. पण निकाल खूप अनपेक्षित लागला. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख यांचा या निवडणुकीत पराभव झाला. स्वरूपानंद देशमुख यांनी 92 मतांच्या फरकाने त्यांचा पराभव केला. या निकालावर संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय देशमुख काय म्हणाले ?
संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी वहिनीचा पराभव मान्य करून नवनिर्वाचित सरपंचाला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दिवंगत संतोष अण्णा देशमुख (Santosh Deshmukh) यांचे गावासाठी असलेली व्हिजन घेऊन काम करणार असल्याचे ते म्हणाले. माझं आणि गावाचं संतोष अण्णा असताना जे कॉम्बिनेशन होतं, ते नीट राहिले नाही. संतोष अण्णांना न्याय मिळवून देण्यासाठी मला, कुटुंबाला आणि गावाला, सगळ्या लोकांना रस्त्यावर उतरावं लागलं. प्रत्येकवेळी प्रत्येक व्यक्ती मला वेळ देऊ शकत नाही. मला या प्रकरणात दिल्लीपर्यंत जायची वेळ आली आहे. भविष्यातही जावं लागणार आहे. गावकऱ्यांना मला वेळ देणं झाला नाही, हे ही पराभवाचे कारण आहे. आता आमचा राजकीय वाद संपला आहे. आता आम्ही पुढे जाणार आहोत. गावच्या विकासाठी आम्ही मदत करायला तयार असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले. (Beed Massajog Election Results 2026)
मस्साजोगामध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी काल मतदान झाले आणि आज सकाळी मतमोजणी झाली. स्वरुपानंद देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख (Ashwini Deshmukh) यांचा 92 मतांनी पराभव करत या निवडणुकीत बाजी मारली. या निवडणुकीत अश्विनी देशमुख यांना सहानुभूतीच्या फॅक्टरचा फायदा होईल, असा अंदाज होता. मात्र, हा अंदाज फोल ठरला आणि स्वरुपानंद देशमुख विजयी झाले. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा पहिल्या फेरीपासूनच स्वरुपानंद देशमुख यांनी मोठी आघाडी घेतली. पहिली, दुसरी आणि तिसरी अशा मतमोजणीच्या तिन्ही फेऱ्यांमध्ये स्वरुपानंद देशमुख आघाडीवर होते. सरतेशेवटी त्यांनी 92 मतांनी विजय प्राप्त केला. (Beed Massajog Election Results 2026)
कुठल्या फेरीत किती मतं मिळाली ?
स्वरुपानंद देशमुख 92 मताने विजयी झाले. पहिल्या फेरीत ते 156 मतांनी आघाडीवर होते.दुसऱ्या फेरीत 20 मतांनी आघाडीवर होते. शेवटच्या तिसऱ्या फेरीत ते 92 मताने विजयी झाले. स्वरुपानंद देशमुख हे संतोष देशमुख यांना अभिवादन करून देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध करुन संतोष अण्णांना खरी श्रद्धांजली द्यावी, अशी इच्छा व्यक्त करण्यात येत होती.मात्र स्वरूपानंद देशमुख यांनी शेवटपर्यंत अर्ज मागे घेण्यास नकार दिला.






