Maharashtra Heat Wave : राज्यभर उष्णतेचा कहर; अकोल्यात ४५.६ अंशांची नोंद, पुढील दोन दिवसांत आणखी वाढीचा अंदाज

महाराष्ट्रात सध्या उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत असून राज्यभर तापमानाने अक्षरशः उच्चांक गाठला आहे. मराठवाडा, विदर्भासह अनेक भागांमध्ये उष्णतेचा पारा सातत्याने वाढत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून अनेक ठिकाणी अघोषित संचारबंदी असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः विदर्भातील अकोला शहरात या मोसमातील सर्वाधिक ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत तापमान ४६ अंशांपर्यंत जाण्याचा इशारा दिल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.


अकोल्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमान सातत्याने वाढत आहे. २१ एप्रिलला ४३.६ अंश, २२ एप्रिलला ४३.७ अंश, २३ एप्रिलला ४४.३ अंश, २४ एप्रिलला ४५ अंश तर २५ एप्रिलला तब्बल ४५.६ अंश तापमान नोंदवले गेले. या वाढत्या तापमानामुळे अकोला हे सध्या जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांपैकी एक ठरत असल्याचे चित्र आहे.


दरम्यान, परभणीत उष्माघातामुळे एका ३७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शिवाजी बबन कांबळे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून दिवसभर उन्हात फिरल्यानंतर त्यांना चक्कर आली आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आणि उष्णतेच्या तीव्रतेची गंभीरता अधोरेखित झाली आहे.



जळगाव शहरातही तापमान ४३ अंशांच्या पुढे गेल्याने प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरातील प्रमुख चौकांमध्ये टँकरद्वारे पाणी मारण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे. पुण्यात देखील तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला असून गेल्या आठवड्याभरापासून उष्णतेची तीव्रता कायम आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी पुणेकर विविध थंड पेयांचा आस्वाद घेताना दिसत आहेत. विशेषतः उसाचा रस हा आयुर्वेदिकदृष्ट्या फायदेशीर मानला जात असल्याने त्याला मोठी मागणी आहे.


लातूर जिल्ह्यातही तापमानाचा पारा वाढत असून अनेक ठिकाणी ४२ अंशांपर्यंत तापमान पोहोचले आहे. दुपारी एक ते चार या वेळेत नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. निलंगा तालुक्यातील औराद-शहाजनी येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. धुळे शहरात ४४ अंश तापमानाची नोंद झाली असून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या उकाड्यामुळे नेहमी गजबजलेले रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. बुलढाणा शहरात तब्बल ६८ वर्षांनंतर तापमानाने ४३ अंशांचा टप्पा गाठला आहे. पूर्वी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे बुलढाणा आता उष्णतेच्या झळा सहन करत आहे. यापूर्वी १९५४ आणि १९५८ मध्ये ४२.२ अंश तापमानाची नोंद झाली होती, मात्र यंदा त्याहून अधिक तापमान नोंदले गेले आहे.


मुंबईतही एप्रिल महिन्यातच तापमान ३९ अंशांपर्यंत पोहोचले आहे. हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्यानंतर मुंबईकरांनी दुपारच्या वेळेत घरातच राहणे पसंत केले आहे.



दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे देशभरात विजेच्या मागणीतही विक्रमी वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात विजेच्या मागणीने २४० गिगावॉटचा टप्पा गाठला. गेल्या वर्षी जून महिन्यात विजेची सर्वाधिक मागणी २४२.७७ गिगावॉट इतकी नोंदवली गेली. वाढती उष्णता आणि एप्रिल महिन्यापासूनच सुरू झालेल्या हीटवेव्हमुळे देशभरात विजेच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.


उन्हाळी हंगामातली आतापर्यंतही ही सर्वोच्च पातळी आहे. कमाल तापमान ४० ते ४५ अंश सेल्सिअसच्यादरम्यान असल्याने आणि उष्णतेच्या लाटांचा प्रभाव असल्यामुळे एसी, कुलर्स आणि पंख्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कृषी क्षेत्रात पंप संचांचा वापर वाढल्यामुळेही विजेचा खप वाढला आहे. उन्हाळ्यात विजेची सर्वाधिक मागणी अंदाजे २७० गिगावॉटपर्यंत पोहोचू शकते असा अंदाज विद्युत विभागाने वर्तवला आहे.


या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडू नये, पुरेसे पाणी प्यावे, हलके व सैल कपडे परिधान करावेत आणि उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. राज्यभर उष्णतेचा कहर वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

Comments
Add Comment

Festival Season Sugar Limit : सण-उत्सवांच्या काळात साखरेची झळ! स्विगी, झेप्टो, ब्लिंकिटसह डी-मार्टमध्ये साखर खरेदीवर निर्बंध

मुंबई : येत्या सणासुदीच्या दिवसांत प्रत्येक घरात विविध प्रकारचे गोडधोड पदार्थ आणि पारंपारिक मिठाया

Jalgaon : ११ हजार किमीच्या सात रेल्वे मार्गांचे लवकरच चौपदरीकरण, मुंबई-हावडा मार्गाचा समावेश

Jalgaon : देशातील अतिवर्दळीच्या रेल्वे मार्गांवरील वाढता प्रवासी आणि मालवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी भारतीय

Jalgaon : सौंदर्य प्रसाधने घेताना जरा जपूनच ! जळगावात विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांवर अन्न व औषध प्रशासनाचा छापा

Jalgaon FDA Raid : जळगाव जिल्ह्यात विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती आणि विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर

Jalgaon Crime : भीषण ! रेल्वे मार्गावर एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, हत्या की आत्महत्या ? गूढ वाढलं

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी पहाटे एकाच कुटुंबातील

Maharashtra Weather Alert : ऑगस्टअखेर पावसाची सुट्टी? महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल; जाणून घ्या आजचं अपडेट

मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल जाणवत असून, राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाल्याचे चित्र आहे.

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे