Monday, August 31, 2026

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने पुढे चाललेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात 65 वर्षीय प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर बसमधील 10 प्रवासी जखमी झाले आहेत. हेमंत हरिश्चंद्र दाभाडे, रा. वैजापूर, असे मृत प्रवाशाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी ट्रॅव्हल्स बस छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात होती. वैजापूरजवळ बसचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर बस पुढे जाणाऱ्या कंटेनरवर जोरात आदळली. धडक इतकी जोरदार होती की बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. (Samruddhi Highway Accident)

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून तातडीने वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर उपचार सुरू असून, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

या अपघातामुळे समृद्धी महामार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

प्राथमिक माहितीनुसार, बसच्या वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा तपास वैजापूर पोलीस करत आहेत. समृद्धी महामार्गावर वेगामुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असून, वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >