Wednesday, August 12, 2026

Zeeshan Siddique : ‘तुला जिवंत सोडणार नाही’; NCP नेते झीशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी, फरार गँगस्टरकडून ऑडिओ मेसेज

Zeeshan Siddique : ‘तुला जिवंत सोडणार नाही’; NCP नेते झीशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी, फरार गँगस्टरकडून ऑडिओ मेसेज

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि आमदार झीशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, ही धमकी एका फरार गँगस्टरकडून ऑडिओ मेसेजद्वारे देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, झीशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

फरार गँगस्टरकडून थेट धमकी?

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा फरार गँगस्टर झीशान अख्तर याने झीशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर धमकीचा ऑडिओ मेसेज पाठवल्याचा दावा करण्यात आला आहे. या मेसेजमध्ये सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. झीशान सिद्दीकी सध्या भारताबाहेर असल्याचे सांगण्यात येत असून, परदेशात असतानाच त्यांना हा धमकीचा मेसेज मिळाला.

मुख्यमंत्र्यांसह मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार :

धमकीचा ऑडिओ मेसेज मिळाल्यानंतर झीशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांनी तातडीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांना या प्रकरणाची माहिती दिली. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

यापूर्वीही मिळाल्या होत्या धमक्या :

झीशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांना यापूर्वीही धमकीचे मेसेज आणि ऑडिओ कॉल्स आल्याची माहिती समोर आली होती. मात्र, यावेळी थेट फरार गँगस्टर झीशान अख्तर याच्याकडून धमकीचा ऑडिओ मेसेज आल्याचा दावा असल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

सायबर आणि गुन्हे शाखेकडून तपासाची शक्यता :

हा धमकीचा मेसेज नेमका कुठून आणि कशा पद्धतीने पाठवण्यात आला, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणात सायबर आणि गुन्हे शाखेच्या माध्यमातून तपास केला जाण्याची शक्यता आहे. धमकीमागे नेमका कोणाचा हात आहे, तसेच हा संदेश पाठवण्यासाठी कोणते माध्यम वापरण्यात आले, याचा शोध तपास यंत्रणा घेणार आहे.

दरम्यान, या धमकीच्या पार्श्वभूमीवर झीशान सिद्दीकी यांच्या सुरक्षेचा मुद्दाही महत्त्वाचा ठरला असून, पोलिसांकडून या प्रकरणात पुढील कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Zeeshan Siddique)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा