Tuesday, April 21, 2026

Mumbai 3.0 : अटल सेतू ते पुणे द्रुतगती जोडमार्ग फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणार

Mumbai 3.0 : अटल सेतू ते पुणे द्रुतगती जोडमार्ग फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणार

- ‘मुंबई ३.०’साठी कनेक्टिव्हिटीचे जाळे; जोडमार्गाचे अभियांत्रिकी टप्पे पूर्णत्वाकडे

मुंबई : मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांमधील प्रवासाचे अंतर अवघ्या काही मिनिटांवर आणणाऱ्या 'अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग' या जोडप्रकल्पाने (कनेक्टर) महत्त्वाचे अभियांत्रिकी टप्पे ओलांडले आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या कामाला विशेष गती दिली असून, आतापर्यंत १४३ ठिकाणी पाया उभारणी (फाऊंडेशन) पूर्ण झाली आहे. या प्रकल्पामुळे 'मुंबई ३.०' च्या संकल्पनेला बळ मिळणार असून नवी मुंबई विमानतळ आणि पुण्याकडे जाणारा प्रवास सिग्नलविरहित होणार आहे.

७.३५ किमी लांबीच्या या सहा मार्गिकांच्या पुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. एकूण १७६ पायाभूत ठिकाणांपैकी १४३ ठिकाणचे काम पूर्ण झाले असून, १४१ ठिकाणी पियर्स (खांब) उभे राहिले आहेत. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या ८३० प्रीकास्ट गर्डर्सपैकी ६५३ गर्डर्सची उभारणी पूर्ण झाली आहे. पळस्पे परिसरात द्रुतगती मार्गाला जोडण्यासाठी स्लिप रोड्स आणि सर्व्हिस रोड्सच्या रुंदीकरणाचे कामही समांतरपणे सुरू आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडीविना प्रवाशांना महामार्गावर प्रवेश मिळेल.

हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर अटल सेतूमार्गे (शिवडी-न्हावा शेवा) चिर्ले आणि पळस्पेवरून थेट पुण्याकडे जाता येईल. यामुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार असून लॉजिस्टिक्स क्षेत्रालाही गती मिळणार आहे. विशेष म्हणजे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही या मार्गामुळे सुलभ प्रवेश मिळणार असल्याने हा मार्ग भविष्यात मुंबई आणि पुण्याच्या आर्थिक प्रगतीचा कणा ठरणार आहे.

नोकरदार आणि विद्यार्थ्यांचा दैनंदिन प्रवास सुलभ होईल : डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

अटल सेतूमार्गे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आता सिग्नलविरहित प्रवास शक्य होईल. यामुळे नोकरदार आणि विद्यार्थ्यांचा दैनंदिन प्रवास सुलभ होईल. 'मुंबई ३.०' घडवताना तासांचा प्रवास मिनिटांत आणण्याचे आमचे 'मुंबई इन मिनिट्स' हे उद्दिष्ट या प्रकल्पाद्वारे पूर्ण होत आहे.

गुंतवणुकीला पूरक वातावरण :

फेब्रुवारी २०२७ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे उद्दिष्ट आहे. हा मार्ग नव्या विकासकेंद्रांना जोडणारा दुवा ठरेल. यामुळे मुख्य मुंबईवरील ताण कमी होऊन नवी मुंबई आणि आसपासच्या भागात औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल. समुद्री पूल, द्रुतगती मार्ग आणि मेट्रो नेटवर्कचे एकात्मिक जाळे विणण्याच्या एमएमआरडीएच्या योजनेतील हा एक महत्त्वाचा दुवा आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये :

लांबी : ७.३५ किलोमीटर. मार्गिका : सहा (११.५ मी. + ११.५ मी. रुंद). प्रमुख जोडणी : अटल सेतू, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि नवी मुंबई विमानतळ. सद्यस्थिती : १४१ पियर्स आणि ६५३ गर्डर्सची उभारणी पूर्ण.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >