Sunday, April 19, 2026

Navnath Ban PC : जनताच काँग्रेसला संपवेल, राऊतांनी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी, नवनाथ बननी सुनावले

Navnath Ban PC : जनताच काँग्रेसला संपवेल, राऊतांनी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी, नवनाथ बननी सुनावले
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील काँग्रेसचा उल्लेख मोजण्यापेक्षा संजय राऊत यांनी ते ज्या पक्षात आहे त्या पक्षाच्या दयनीय अवस्थेची चिंता करावी. देशभरात काँग्रेसला जनतेने नाकारले आहे. लोकसंख्येनुसार खासदारांची संख्या वाढवणे आवश्यक असताना दक्षिणेकडील राज्यांच्या वाढीला विरोध का केला याचे उत्तर राऊतांनी द्यावे, असा रोकडा सवाल भाजपच्या नवनाथ बन यांनी केला. जनतेने राऊतांचा झेल घेऊन त्यांची विकेट काढली आहे. विधानसभा, महापालिका आणि इतर निवडणुकांत पराभव झाल्याने कोण फेल आहे हे स्पष्ट झाले आहे. मोदी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा विश्वास दाखवला आहे. जनतेनेच राऊतांना राजकीयदृष्ट्या पांगळं केलं आहे. पंतप्रधान मोदी हे देशाचा आधारस्तंभ आहेत. मोदींच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर गेला आहे. सलग तीन वेळा जनतेने त्यांना पंतप्रधानपदी निवडून दिलं, हेच त्यांच्या कार्याचं मोठं प्रमाण आहे. मोदी सरकारने महिलांना सन्मान देण्यासाठी विधेयक आणले, मात्र त्याला विरोध करून नारी शक्तीचा अपमान करण्यात आला. याचा हिशेब जनता नक्कीच घेईल, असे बन म्हणाले. उत्तर दक्षिण असा वाद घालण्यापेक्षा विरोधकांनी वस्तुस्थिती स्वीकारावी, असेही ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर गेलेल्या लोकांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. राज्यात धर्मांतराच्या घटनांवर ठाकरे गट गप्प दिसतो. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहादवर उबाठा काहीच बोलत नाही. उबाठाने मतपेढीसाठी कॉर्पोरेट जिहादकडे दुर्लक्ष केले आहे, असा घणाघात भाजपच्या नवनाथ बन यांनी केला. भाजप कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. पण अफझल खानाच्या विचारांचा विरोध करतो. देशासाठी योगदान देणाऱ्या मुस्लिमांचा आम्हाला अभिमान आहे, मात्र राऊत जाणीवपूर्वक चुकीचा प्रचार करत आहेत, असा आरोप नवनाथ बन यांनी केला. विधान परिषदेच्या जागेसाठी ठाकरे गटाला काँग्रेससमोर झुकावे लागत असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला. एकेकाळचा स्वाभिमानी पक्ष आज सत्तेसाठी तडजोड करत असल्याची टीका करत त्यांनी जनतेच्या विरोधात भूमिका घेतल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे ते म्हणाले.
Comments
Add Comment