Saturday, April 18, 2026

Ultra’ Electric Scooter : सिंपल एनर्जीची ‘अल्ट्रा’ इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च

Ultra’ Electric Scooter : सिंपल एनर्जीची ‘अल्ट्रा’ इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च

मुंबई : बेंगळुरूस्थित सिंपल एनर्जी या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने भारतीय बाजारात आपला नवीन ‘सिंपल एनर्जी अल्ट्रा’ हा इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केला आहे. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत सुमारे 2.35 लाख रुपये ठेवण्यात आली असून, कंपनीच्या जन 2 पोर्टफोलिओमधील ही चौथी स्कूटर ठरते. हाय-परफॉर्मन्ससह लांब रेंज देणारी स्कूटर शोधणाऱ्या ग्राहकांना लक्षात घेऊन हे नवीन व्हेरिएंट बाजारात आणण्यात आले आहे.

सिंपल एनर्जी अल्ट्रामध्ये 6.5 किलोवॅट-आवर क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला असून, एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही स्कूटर तब्बल 400 किलोमीटरपर्यंतची आयडीसी-सर्टिफाइड रेंज देऊ शकतो. या दमदार रेंजमुळे ही सध्या भारतातील सर्वाधिक रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर्सपैकी एक मानली जात आहे. परफॉर्मन्सच्या बाबतीतही ही स्कूटर मागे नाही. फक्त 2.77 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग गाठण्याची क्षमता या स्कूटरमध्ये आहे, तर त्याची टॉप स्पीड 115 किमी प्रतितास इतकी आहे. त्यामुळे ही स्कूटर कंपनीच्या लाईनअपमधील दुसऱ्या क्रमांकाची वेगवान स्कूटर ठरते, जी सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरच्या खालोखाल येते.

फीचर्सच्या दृष्टीने पाहता, या स्कूटरमध्ये चार लेव्हल्सचा ट्रॅक्शन कंट्रोल देण्यात आला आहे, तसेच सात इंचाचा डिजिटल रायडर डिस्प्लेही देण्यात आला आहे, जो आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव देतो. त्यामुळे परफॉर्मन्स, टेक्नॉलॉजी आणि लांब रेंज यांचा संगम शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक आकर्षक पर्याय ठरू शकतो.

कंपनीने यावर्षीच्या सुरुवातीला या स्कूटरसाठी बुकिंग सुरू केली असून, लवकरच त्याच्या डिलिव्हरीलाही सुरुवात होणार आहे. सध्या कंपनीचे देशभरात सुमारे 70 टचपॉइंट्स आहेत, ज्यामध्ये बेंगळुरू, दिल्ली, हैदराबाद, कोच्ची, चेन्नई आणि गोवा यांसारख्या प्रमुख शहरांचा समावेश आहे. याशिवाय नागपूर, रांची आणि भुवनेश्वर येथे नवीन आउटलेट्स सुरू करण्याची तयारीही कंपनीकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा