छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, शुक्रवारी झालेल्या एका भीषण अपघातात शिवनिका ट्रस्टचे माजी उपाध्यक्ष आणि उद्योजक जितेंद्र शेळके यांचा दुर्दैवी अंत झाला. संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने प्रवास करत असताना धोत्रे गावाजवळ हा थरार घडला. उभ्या असलेल्या एका कंटेनरला शेळके यांच्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कार थेट कंटेनरच्या खालच्या भागात घुसली, ज्यामध्ये शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात केवळ जितेंद्र शेळके यांचाच नव्हे, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताच्या वेळी त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या मुलाला तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अपघातानंतर शेळके यांच्या पत्नी बराच वेळ कारच्या ढिगाऱ्यात अडकून पडल्या होत्या. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. जितेंद्र शेळके हे वादग्रस्त ठरलेले 'शिवनिका ट्रस्ट'चे सर्वेसर्वा अशोक खरात यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जात होते. ट्रस्टमध्ये उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळण्यासोबतच, खरात यांच्या लॉन्स व्यवसायातही शेळके यांची मोठी भागीदारी होती. सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून अशोक खरात यांना झालेल्या अटकेमुळे जितेंद्र शेळके हे प्रचंड मानसिक तणावाखाली होते.
इंडोनेशियाच्या बोर्निओ बेटावर दोन पाम ऑइल प्लांटेशन दरम्यान उड्डाण करणारे हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठा अपघात घडला आहे. या अपघातात सर्व आठ जणांचा ...
अशोक खरातचा '२१-४९-७१' फॉर्म्युल्यामागचं गूढ काय ?
भोंदू अशोक खरात याच्या आर्थिक साम्राज्याचा तपास करताना पोलीस एका विचित्र आकड्यांच्या जाळ्यात अडकले आहेत. राहाता येथील समता नागरिक सहकारी पतसंस्थेत खरातने ५७ व्यक्तींच्या नावावर तब्बल १०० बनावट खाती उघडल्याचे उघड झाले असून, यामध्ये '२१, ४९ आणि ७१' या आकड्यांचा एक विशिष्ट पॅटर्न समोर आला आहे. पोलीस तपासानुसार, ही सर्व खाती कोविडच्या काळात केवळ २१ तारखेलाच उघडण्यात आली होती. विशेष म्हणजे, या खात्यांमध्ये होणारे व्यवहारही ठराविक रकमांचेच होते. अनेक खात्यांत वारंवार ४९ लाख आणि ७१ लाख रुपये जमा केले जायचे आणि पुन्हा काढले जायचे. प्रत्येक व्यक्तीच्या नावावर दोन खाती उघडून त्या सर्व ठिकाणी अशोक खरातने स्वतःचे नाव 'वारस' (Nominee) म्हणून नोंदवले होते. खरात हा अंकशास्त्रावर (Numerology) विश्वास ठेवून हे व्यवहार करत होता की, तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी त्याने हा 'तांत्रिक फॉर्म्युला' वापरला, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या प्रकरणाने बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ?
राज्याचे जलसंधारणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर थेट निशाणा साधला आहे. खरात विरोधात अनेक तक्रारी येऊनही पोलिसांनी वेळोवेळी दुर्लक्ष केल्यामुळेच तो इतका काळ मोकाट राहिला, असा खळबळजनक आरोप विखे पाटलांनी केला आहे. केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. काही वरिष्ठ पोलीस अधिकारी खरातचे भक्त असल्याचा दावा त्यांनी केला असून, आयजी दत्तात्रेय कराळे यांनी खरातसोबत एका व्यासपीठावर हजेरी लावल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. नाशिक पोलीस दलातील काही बड्या अधिकाऱ्यांची खरातला सहानुभूती आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. विखे पाटील यांनी केवळ पोलिसांवरच नव्हे, तर खरातच्या राजकीय कनेक्शनवरही बोट ठेवले आहे. खरातला नेमका कोणाचा वरदहस्त होता आणि त्याचे राजकीय लागेबांधे कोणाशी आहेत, हे सत्य जनतेसमोर येणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या वाढत्या दबावामुळे आता नाशिक पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलीस तपासातील गोपनीय माहिती 'लीक'
नीरज जाधव विरुद्ध १८ फेब्रुवारीला एका २४ वर्षीय तरुणीने शिर्डी पोलीस ठाण्यात आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याप्रकरणी तक्रार दिली होती. मात्र, या प्रकरणाच्या तपासाची इत्थंभूत माहिती थेट भोंदू अशोक खरातपर्यंत पोहोचत असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि मोबाईल डेटा रिकव्हर केल्यानंतर खरात आणि फिर्यादी तरुणी यांच्यातील थेट संपर्क उघड झाला आहे. तपासादरम्यान पोलीस काय विचारत आहेत आणि काय कारवाई सुरू आहे, याची सर्व माहिती खरातला मिळत होती. विशेष म्हणजे, ११ मार्च रोजी खरातने त्या तरुणीला एक मेसेज पाठवून पोलिसांना न भेटण्याचा सल्ला दिला होता. "काल अधिकाऱ्यांनी तुमचा छळ केला, आता पुढचं मी बघतो," अशा आशयाचा संदेश खरातने पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. राज्य महिला आयोगाने दखल घेतलेल्या या संवेदनशील प्रकरणाची माहिती खरातपर्यंत पोहोचवण्यामागे पोलीस दलातीलच कुणी "खबऱ्या" आहे का, असा संशय आता बळावला आहे. पोलिसांच्याच तपासातील माहितीचा वापर करून खरात पीडितेवर प्रभाव पाडत असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. हा मेसेज समोर आल्यानंतर आता खरातच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.






