Wednesday, April 15, 2026

IPL 2026 CSK vs KKR : चेन्नईचा चेपॉकवर दबदबा! चेन्नईचा कोलकातावर ३२ धावांनी विजय

IPL 2026 CSK vs KKR : चेन्नईचा चेपॉकवर दबदबा! चेन्नईचा कोलकातावर ३२ धावांनी विजय

मुंबई : आयपीएलच्या २२ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं कोलकाता नाइट रायडर्सवर शानदार विजय मिळवत स्पर्धेत आपली पकड मजबूत केली. चेन्नईनं प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ५ बाद १९२ धावांचा भक्कम डोंगर उभारला. प्रत्युत्तरात १९३ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या केकेआरला २० षटकांत ७ बाद १६० धावांपर्यंतच मजल मारता आली आणि चेन्नईनं हा सामना ३२ धावांनी जिंकला.

चेपॉकच्या मैदानावर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे यानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय फारसा फायदेशीर ठरला नाही. चेन्नईची सुरुवात थोडी ढासळलेली असली तरी आयुष म्हात्रे (३८) आणि संजू सॅमसन (३८) यांनी डाव सावरला. त्यानंतर सर्फराज खान आणि डेवाल्ड ब्रेविस यांनी मधल्या फळीमध्ये महत्त्वाची भागीदारी करत संघाला १९२ धावांपर्यंत पोहोचवलं. केकेआरकडून कार्तिक त्यागीनं २ विकेट घेतल्या, तर सुनील नरेनला १ विकेट मिळाली. मात्र वैभव अरोरा आणि कॅमेरुन ग्रीन महागडे ठरले.

केकेआरचा संघर्ष अपुरा, पराभवाची मालिका कायम :

धावांचा पाठलाग करताना केकेआरला चांगली सुरुवात मिळाली नाही. फिन एलन अवघ्या १ धावेवर बाद झाला. सुनील नरेन (२४), अजिंक्य रहाणे (२८) आणि अंगकृष रघुवंशी (२७) यांनी सुरुवात चांगली केली, पण मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. रिंकू सिंग (६) आणि कॅमेरुन ग्रीन खातेही उघडू शकले नाहीत. शेवटी रोवमन पॉवेल (३१) आणि रमणदीप सिंग (३५) यांनी प्रयत्न केले, पण ते विजयासाठी अपुरे ठरले.

या पराभवामुळे केकेआरची पराभवाची मालिका कायम राहिली असून ते गुणतालिकेत तळाला पोहोचले आहेत. तर दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जनं दमदार कामगिरी करत स्पर्धेत आपली स्थिती मजबूत केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा