Asha Bhosle : स्वरस्वामिनी आशा भोसले यांना मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज मंत्र्यांनी वाहिली आदरांजली

मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. आशा भोसले यांना काल (शनिवार ११ एप्रिल २०२६) हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आशा भोसलेंची नात झानई भोसले हिने इन्स्टा पोस्ट करून आजी ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगितले होते.


आशा भोसले मागील सात दशकांपासून पार्श्वगायन करत होत्या. त्यांनी मराठी, हिंदीसह अनेक भाषांतील चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. चुनरिया या १९४८ मध्ये आलेल्या चित्रपटापासून आशा भोसले यांच्या पार्श्वगायनाच्या कारकि‍र्दीला सुरुवात झाली. त्यांनी वीसपेक्षा जास्त भाषांमध्ये १६ हजारांपेक्षा जास्त गाणी गायली. मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रशियनसह एकूण २० भाषांमध्ये आशा भोसले यांनी पार्श्वगायन केले.


संगीत क्षेत्रासोबतच राजकीय क्षेत्रातल्या अनेक दिग्गज नेत्यांनी आशाताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस :


तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्‍या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली.
आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. ‘तोरा मन दर्पण कहलाए’ अशा भावपूर्ण गाण्यापासून ‘खल्लास’पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणार्‍या आशाताई भोसले यांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, लोकगीते, पॉप असे अनेक संगीत प्रकारांचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी, हिंदी, बांगलासह 20 भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये १२,००० वर गाणी त्यांनी गायली. ‘महाराष्ट्र भूषण’सारखा ‘बांगला विभूषण’ पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. बदलांना सहजरित्या आत्मसात करणार्‍या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही. अलिकडेच जागतिक रेडिओ दिनाच्या कार्यक्रमात आम्ही सोबत होतो, त्यांनी आग्रह करुन ‘अभी ना जाओ छोडकर...’ हे गाणे माझ्याकडून गाऊन घेतले होते आणि ‘पहा मी मुख्यमंत्र्यांना गाणं गायला लावले’, असे म्हणाल्याही होत्या. त्या आशाताईंचा सहवास आता आपल्याला लाभणार नाही, ही कल्पनाच करवत नाही.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि देशभरातील असंख्य चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
ॐ शांति



केंद्रीय मंत्री नितीन गडकरी :


भारतीय संगीतविश्वातील प्रसिद्ध आणि दिग्गज गायिका, पद्मविभूषण Asha Bhosle यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्यासोबत माझे कौटुंबिक संबंध होते. त्यांचे जाणे हे भारताच्या संगीत क्षेत्रासाठी अपरिमित नुकसान आहे।


आपल्या विलक्षण प्रतिभेच्या जोरावर आशाजींनी संगीताच्या आकाशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. नया दौर, तीसरी मंज़िल, हरे रामा हरे कृष्णा, उमराव जान यांसारख्या चित्रपटांपासून ते इजाज़त आणि रंगीलासारख्या काळानुसार बदलणाऱ्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमधील गाणी त्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केली. पार्श्वगायिका म्हणूनही त्यांनी अनेक अविस्मरणीय गीते दिली।


संगीत क्षेत्रातील त्यांचा स्वर आणि त्यांचे मोलाचे योगदान पिढ्यान्पिढ्या स्मरणात राहील. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ॐ शांती



उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे :


गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या दुःखद निधनाने गेल्या चार पिढ्यांची मने संगीताच्या बहरात चिंबचिंब करणारा, आणि मनामनांना एका चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला आहे. आशाताईंचा स्वर कानावर पडला नाही, असा दिवस गेल्या अनेक दशकांत उजाडला नाही, आणि मावळलाही नाही. या स्वराने असंख्य क्षण फुलविले, आणि फुलवत शकुनाच्या मेंदीने रंगलेले जगण्याचे असंख्य क्षण हसविलेदेखील. आशाताई ऐहिकदृष्ट्या आपल्यात नाहीत ही जाणीव पचविणे अवघड आहे, पण त्या स्वरांची सोबत मात्र कायम राहणार आहे. कारण या स्वरांचा साज कालातीत आहे. अनेक वेळा आशाताईंनी भेटण्याचे भाग्य मला लाभले, ते अविस्मरणीय क्षण कायमस्वरूपी माझ्या मनात अजरामर राहतील.


आशाताईंच्या आत्म्यास सद्गती लाभावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना. आम्ही संपूर्ण शिवसेना परिवार त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहोत.


सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार :



उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार


ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे. मी आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.


आशाताई भोसले यांच्या आवाजात विलक्षण माधुर्य, विविधता आणि भावनांची अप्रतिम अभिव्यक्ती होती. हिंदी, मराठीसह विविध भारतीय भाषांमधील हजारो गाण्यांमधून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘इन आंखों की मस्ती’, ‘चुरा लिया है तुमने’ यांसारखी असंख्य गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. त्यांच्या गायकीत आधुनिकतेसोबतच पारंपरिकतेचा सुंदर संगम दिसून येतो.


आशाताई भोसले यांचा संगीत प्रवास म्हणजे कठोर परिश्रम, सातत्य आणि कलेप्रति असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे. त्यांनी अनेक पिढ्यांतील श्रोत्यांना आपल्या सुरांनी मंत्रमुग्ध केले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत आशाताई भोसले यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. आपल्या कर्तृत्वाने संगीत क्षेत्रात त्यांनी मानाचे स्थान निर्माण केले. त्यांच्या अद्वितीय योगदानामुळे त्यांना जागतिक स्तरावरही विशेष ओळख मिळाली होती. आशाताईंच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना झालेले हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करते.



जगण्यातील श्रीमंती गमावली !


भोगल्या दु:खाचे आनंदी गाणे गाण्याची ताकद असलेल्या... जय शारदे.. वागेश्वरी ची प्रार्थना गाणाऱ्या... कॅब्रे, लावणी, भक्ती गीत, ओवी आणि अभंगासह भावगीत, चित्रपट गीत ही विलक्षण ताकदीने गाणाऱ्या... भाषेची बंधने तोडून २० पेक्षा जास्त भाषेत गाणाऱ्या... स्वतःच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाला लिलया हरवणाऱ्या... आणि भाऊबीजेला "सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती..." अशी अजरामर ओवाळणी गाणाऱ्या आशाताई गेल्या.


माझ्यासाठी तर माझी प्रिय बहिण मी आज गमावली... साक्षात सरस्वतीच्या वीणेची झंकार आज शांत झाली. मला भाऊ म्हणून उदंड प्रेम त्यांनी दिले. मी आज काय गमावले हे शब्दात सांगता येणार नाही...माझ्या जगण्यातील श्रीमंती मात्र आज गमावली...


त्यांच्या असंख्य भेटी माझ्या हृदयात साठवलेल्या आहेत... काही दिवसांपूर्वीची ही एक संस्मरणीय भेट !



कॅबिनेट मंत्री नितेश राणे :


भारतीय संगीतविश्वातील अजरामर आवाज, जागतिक कीर्तीच्या पार्श्वगायिका, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे.


आपल्या बहारदार आवाजाने, विविधतेने नटलेल्या गाण्यांनी आणि दशकानुदशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशा भोसले यांनी संगीतसृष्टीला अमूल्य असा ठेवा दिला. हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती आणि अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. मराठी, हिंदी, बांगलासह 20 भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये 12,000 वर गाणी त्यांनी गायली.


त्यांच्या जाण्याने संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

ॐ शांति



ज्येष्ठ नेते शरद पवार :


आशाताईंच्या रूपाने भारतीय संगीतविश्वातील अजरामर आवाज हरपला आहे. त्यांच्या निधनामुळे संगीताच्या एका सुवर्णयुगाला विराम मिळाला आहे. त्यांच्या आवाजातली खुमारी, चपळता आणि भावनांची खोली ही त्यांची खरी ओळख ठरली. हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी आणि अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन तब्बल सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीतविश्वासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. आज त्यांचा आवाज थांबला असला, तरी त्यांचे सूर सदैव घुमत राहतील. आशाताईंनी प्रत्येक भारतीय संगीतप्रेमींच्या मनात निर्माण केलेले अढळ स्थान कायम राहील. राष्ट्रीय पुरस्कार, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके अशा असंख्य पुरस्कारांच्या मानकरी आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

Comments
Add Comment

Census : जनगणना २०२६ च्या कार्यक्रमाची जबाबदारी अभियंत्यांच्या खांद्यावर?

अत्यावश्यक कामे पुरी करायची की जनगणना?, अभियंत्यांकडून केला जात आहे सवाल मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आगामी भारतीय

Railway : ओव्हरहेड वायर तुटली, पश्चिम रेल्वेची वाहतूक कोलमडली

मुंबई : रेल्वे देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी अनेकदा रविवारी मेगाब्लॉक घेते. पण आज (रविवार १२ एप्रिल २०२६) सकाळीच

Stray Dogs Sterilized : मुंबईत वर्षाला करणार सुमारे ४५ हजार भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण

- पुढील तीन वर्षांसाठी संस्थांची नेमणूक मुंबई (सचिन धानजी) मुंबईतील वाढत्या भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात

Megablock : विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेने मुंबई विभागातील तिन्ही उपनगरीय मार्गांवर रविवारी १२ एप्रिल रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल

Maharashtra : अवजड वाहनांमध्ये क्लीनर बंधनकारक नाही, महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : अवजड मोटार वाहन (एचएमव्ही) चालकांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारने क्लिनर ठेवण्याची अट रद्द केली आहे.

RTE साठी महाराष्ट्रातील १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची निवड

मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया