रायगड : बदलत्या हवामानाचा मोठा फटका यंदा अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी कांद्याच्या उत्पादनात सुमारे २५ टक्क्यांनी घट झाल्याची माहिती समोर आली असून, बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, कांदा उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे.
अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळे आणि परिसरातील भागातील पांढरा कांदा हा चविष्ट व औषधी गुणधर्मांनी समृद्ध म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या कांद्याला मुंबई, पुण्यासह राज्यातील तसेच देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर मागणी असते. नेहुली, खंडाळे, कार्ले, मुळे, वाडगाव, तळवली या गावांमध्ये प्रामुख्याने या कांद्याची लागवड केली जाते.
दोन वर्षांपूर्वी अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) मिळाल्यानंतर शेतकऱ्यांचा उत्साह वाढला होता. त्यामुळे यंदा २२१ हेक्टरवरून तब्बल ३१६ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली. मात्र, पावसाचे आगमन उशिरा झाल्याने लागवडीवर विपरीत परिणाम झाला. त्यातून सावरण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला असला तरी बदलत्या हवामानाचा परिणाम पिकावर झाला.