सोलापूरमधील चिंचोली एमआयडीसीमधील प्रकार
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आदेश
२०० कोटींच्या दंड वसुलीसाठी मालमत्तेवर बोजा चढविण्याचे निर्देश
मुंबई : चिंचोली एमआयडीसीमध्ये झालेल्या बेकायदा मुरूम उत्खनन आणि वाहतूक प्रकरणी महसूलमंत्र्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या आणि कर्तव्यात कसुरी करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर थेट बडतर्फीची कारवाई करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. तसेच, संबंधित कंपन्यांकडून २०० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
२० लाख ब्रासचा अवैध उपसा आणि ५०० कोटींच्या महसुलाचे नुकसान
बैठकीत आमदार राजू खरे म्हणाले की, "चिंचोली एमआयडीसीमध्ये तब्बल २० लाख ब्रास मुरुमाचा अवैध उपसा झाला आहे. मोठ्या प्रमाणात खड्डे खोदून मुरुम काढल्यामुळे नवीन उद्योगांना जागा मिळणे कठीण झाले आहे. यामुळे नियोजित १०० उद्योग येऊ शकले नाहीत आणि शासनाचा ५०० कोटी रुपयांचा अपेक्षित महसूल बुडाला आहे. विनापरवाना उत्खनन करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे."