मुंबई: आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सोमवारी कमालीच्या नाट्यमय घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. भाजप नेत्यांच्या भेटीगाठी आणि 'वरिष्ठ' स्तरावरील चर्चेनंतर तनपुरेंनी हा निर्णय घेतल्याचे समजते. मात्र, त्यानंतर शरद पवार गटाने तातडीने हालचाली करीत, गोविंद मोकाटे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली.
भाजपने या निवडणुकीत दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर आहे. तर, महाविकास आघाडीत राहुरीची जागा शरद पवार यांच्या पक्षाकडे आहे. प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीची जय्यत तयारीही सुरू केली होती. मात्र, सोमवारी सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी थेट तनपुरे यांचे कार्यालय गाठले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा झाल्यानंतर तनपुरे यांनी 'वैयक्तिक कारणास्तव' निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता असताना, शरद पवार गटाने अन्य उमेदवार रिंगणात उतरवला. दरम्यान, ही पोटनिवडणूक केवळ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी न राहता तिरंगी होण्याची चिन्हे आहेत. वंचित बहुजन आघाडीने अनिल जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर केल्याने अक्षय कर्डिले यांच्यासमोर त्यांचेही आव्हान असेल.
शरद पवारांनी उमेदवार का दिला?
याविषयी प्रतिक्रिया देताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, सुरुवातीपासूनच निवडणूक न लढण्याची तनपुरे यांची इच्छा होती. कार्यकर्त्यांच्या वाढत्या दबावामुळे त्यांना विश्वासात घेऊन मग निवडणुकीचा निर्णय घेतो, अशी त्यांची भूमिका त्यांनी घेतली होती. तसा निरोपही त्यांनी दिला होता. शेवटी त्यांची मानसिकता नव्हती ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आम्ही दुसरा पर्याय म्हणून गोविंद मोकाटे यांना संधी दिली. जिल्हा परिषदेत त्यांच्या कन्या दोन वेळा निवडून आलेल्या आहेत. ते स्वतः पंचायत समितीला निवडून आले आहेत. शिक्षण संस्थेमध्ये आणि रयतमध्ये काम करत आहेत. त्यांच्याशिवाय अन्य दोन लोकांनी सुद्धा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, आम्ही मोकाटेंना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला, असे शिंदे यांनी सांगितले.