रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक अशी फुलांची आरास करण्यात आली आहे. मंदिराच्या गाभाऱ्याला विविध रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले असून या आकर्षक सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सुंदर सजावटीची एक झलक पाहण्यासाठीही भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दाखल होत आहेत.
संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातून हजारो भाविक गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येत आहेत. भक्तीमय वातावरणात गणरायाच्या दर्शनाचा आनंद भाविक घेत असून मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
गणपतीपुळे मंदिराच्या गाभाऱ्यात यंदा विशेष फुलांची सजावट करण्यात आली आहे. विविध प्रकारच्या सुगंधी आणि रंगीबेरंगी फुलांनी साकारलेली ही आरास अत्यंत मनमोहक आणि देखणी आहे. या सजावटीमुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणाने न्हाऊन निघाला आहे.
संकष्टी चतुर्थी निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी होत असून शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. दूरदूरवरून आलेले भाविक गणरायाच्या दर्शनासाठी रांगा लावताना दिसत आहेत.
'या' चतुर्थीला विकट संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते
गणेशाला विघ्नहर्ता आणि पहिले पूजनीय दैवत मानले जातात. संकष्टी चतुर्थीचा उपवास प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला केला जातो. हा एक विशेष उपवास असून तो गणेशाला समर्पित आहे. या दिवशी भक्त उपवास करून भगवान गणेशाची पूजा करतात. सूर्यास्तानंतर चंद्राला प्रार्थना करून हा उपवास संंपन्न होतो. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला विकट संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते. हा उपवास केल्याने जीवनातील अडथळे आणि अडचणी दूर होतात.