मुंबई : टीम इंडियासोबत आयसीसी २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा मोहम्मद शमी अचानक गायब झाला. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर, शमीचा आयपीएल २०२५ चा हंगाम खराब गेला आणि तेव्हापासून तो कोणत्याही फॉरमॅटमध्ये टीम इंडियामध्ये परतलेला नाही. यामुळे त्याच्या निवृत्तीबद्दल भारतीय क्रिकेटमध्ये चर्चा सुरु झाल्या होत्या. पण आता त्याने यावर आपले मौन सोडले आहे.
शमी २०२५-२६ च्या संपूर्ण हंगामात बंगाल क्रिकेट संघाकडून सातत्याने देशांतर्गत क्रिकेट खेळला. त्याने सर्व फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली, तरीही अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. आता, शमी आयपीएल २०२६ च्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सकडून(Lucknow Super Giants) खेळण्यास तयार आहे.
निवृत्तीबद्दल त्याने एक मुलाखतीत सांगितले की, सोप्या भाषेत सांगायचं तर, मी जेव्हा थकेन तेव्हा निवृत्त होईन आणि मी सध्या निवृत्तीचा विचार करत नाहीये. असे विचार तुम्हाला मागे खेचतात. जरी तुम्ही त्याबद्दल विचार केला, तरी तुम्ही स्वतःला थकलेले आणि पराभूत समजत असता. मी तशा कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही. ज्या दिवशी तुम्ही सकाळी उठून विचार कराल, "मला कंटाळा आला आहे," त्या दिवशी तुम्हाला खेळ सोडावा लागेल. मी फक्त खेळाचा आनंद घेत आहे आणि सकारात्मक विचार करत आहे.
३५ वर्षीय मोहम्मद शमीने भारतासाठी ६४ कसोटी सामन्यांमध्ये २२९ बळी, १०८ एकदिवसीय सामन्यांमध्ये २०६ बळी आणि २५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २७ बळी घेतले आहेत. याशिवाय, शमीने पाच संघांचे प्रतिनिधित्व करत ११९ आयपीएल सामन्यांमध्ये १३३ बळी घेतले आहेत. गेल्या हंगामात शमीने नऊ आयपीएल सामन्यांमध्ये सहा बळी घेतले होते, ज्यानंतर हैदराबादने त्याला संघातून मुक्त केले. पण आता तो लखनऊ सुपर जायंट्ससोबत एक नवीन सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असेल.