ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा कहर

पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, नाशिकमध्ये शेतकरी चिंतातूर


मुंबई : अवकाळी पावसाबाबतचा हवामान विभागाचा अंदाज बऱ्याच दिवसांनी खरा ठरला असून सोमवारी दुपारनंतर महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गारपिटीचा मारा व पडणारा पाऊस यामुळे शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक जण सुरुवातीची काही मिनिटे सुखावला असला तरी अवकाळी पाऊस सतत पडू लागल्याने ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटनांनी व शेतातील पिकांच्या नुकसानीने राज्यातील शेतकरी चिंतातूर झाला आहे.


राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दुपारच्या वेळेतच मुसळधार पाऊस, गारपिट आणि वादळी वाऱ्यांनी अनेक जिल्ह्यांना तडाखा दिला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील ४८ तास राज्यासाठी धोक्याचे असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहरासह भोर तालुक्यात जोरदार पाऊस आणि गारपिट झाली. उत्रौली परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा अक्षरशः सडा पडला. अचानक आलेल्या या पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी काढणीला आलेल्या ज्वारी, गहू आणि हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.


हडपसर शहराच्या पूर्व भागातील हडपसर, मांजरी आणि महंमदवाडी परिसरात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुरुवातीला आकाशात दाट ढग जमा होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह सरी कोसळल्याने कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली. औद्योगिक वसाहत, पुणे सोलापूर महामार्ग, मांजरी, शेवाळेवाडी, साडेसतरानळी, ससाणेनगर, रामटेकडी, शंकरमठ, वैदुवाडी, महंमदवाडी परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर सखल भागात पाणी साचले होते. खोदलेल्या रस्त्यांच्या परिसरात चिखल व पाण्याची डबकी तयार झाली. त्यातून प्रवास करताना प्रवाशांना कसरत करावी लागली.वादळी वारा व पावसामुळे मगरपट्टा रस्त्याजवळील विशाल पार्क जवळ झाड कोसळल्याची घटना घडली.


जुन्नर तालुक्यात आंबा, गहू, कांदा पिकांचे मोठे नुकसान : जुन्नर शहरासह मीना नदीच्या खोऱ्यात वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली. या गारपिटीने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जवळपास एक तासाहून झालेल्या या पावसाने आंबा, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करण्याची मागणी सरपंच अमोल भुजबळ, कुलदीप नायकोडी यांसह शेतकऱ्यांकडून केली जात आहे. जुन्नर तालुक्यातील आंब्याचे आगार म्हणून ओळख असलेल्या काले, येणेरे, बेलसर, वडज , दातखिळेवाडी, पारुंडे, कुसूर, चिंचोली या परिसरात झालेल्या गारपिटीमुळे तसेच वादळामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे कैऱ्या मोठ्या प्रमाणात पडल्याचे दिसून आले. वादळी वारा व गारपिटीमुळे आंबा उत्पादकांच्या उरल्यासुरल्या अपेक्षांवर देखील पाणी पडले आहे. आंबा उत्पादकांचे अर्थकारण संकटात सापडले असून शासनाने आंबा उत्पादकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.


धुळे, नाशिक जिल्ह्यात गारांचा खच : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कांदा, मका, गहू आणि हरभरा पिकांवर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. नाशिकमध्येही जोरदार वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. अनेक भागांत गारांचा खच साचल्याचे चित्र दिसून आले. या अचानक आलेल्या अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सिन्नर परिसरातही पावसाची नोंद झाली.

Comments
Add Comment

यापुढे महापालिकेत ५० खोक्यांची भाषा करणाऱ्यांना मिळणार ५० ठोसे

अशासकीय शब्दांचा वापर करणाऱ्यांना आता सभागृहाबाहेरचा रस्ता मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका सभागृहात

विरोधी पक्षनेत्यांचा पुन्हा एकदा कांगावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांना सध्या कोणत्याही मुद्दयावर आपली भूमिका

महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीवर १३ सदस्यांची नियुक्ती जाहीर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणावर निवडून आलेल्या विविध पक्षांच्या १३ सदस्यांची

नोंदणीकृत मजूर सहकारी संस्थांना विनानिविदा मुंबई महापालिकेत कामे

मुंबई (विशेष प्रतिनिधी)  : मुंबई  महानगरपालिकेच्या विविध विभागांतील कामे ही नोंदणीकृत मजूर सहकारी संस्थांना

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला मिळणार 'टेक ऑफ', मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासासाठी १०० टक्के 'VGF'ला मंजुरी

मुंबई : कोकणच्या विकासाचा कणा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महायुती सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'शिवशाही पुनर्वसन' प्रकल्पाला बळकटी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या उद्देशाने शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची स्थापना केली होती, तोच वारसा