मध्य रेल्वेचा मुंबई विभाग २७ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे, गौरवशाली 'डेक्कन क्वीन एक्सप्रेस' (ट्रेन क्रमांक 12123/12124) चा 'रेल्वे महोत्सव' साजरा करणार असल्याची अभिमानाने घोषणा करत आहे.
कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गाडी सुटण्याच्या एक तास आधी, म्हणजेच १७:१० वाजता, उत्सवाचा प्रारंभ होईल. गाडीच्या भव्यतेचे प्रतीक म्हणून, तिला फुलांनी सुशोभित करण्यात येईल. १९३० सालापासून चालणारी, भारतातील पहिली सुपरफास्ट आणि विजेवर चालणारी गाडी असलेल्या 'डेक्कन क्वीन'चा समृद्ध इतिहास दृकश्राव्य सादरीकरणाद्वारे उलगडून दाखवला जाईल.
आधुनिकीकरणाची कामे
‘रेल्वे महोत्सवा’चा भाग म्हणून, प्रवाशांचा आराम वाढवण्यासाठी आणि तिचे ऐतिहासिक आकर्षण जपण्यासाठी डेक्कन क्वीनचे महत्त्वपूर्ण नूतनीकरण करण्यात आले आहे:
* प्रवासादरम्यान उत्कृष्ट भोजनाचा अनुभव देण्यासाठी डायनिंग कारचे ऐतिहासिक सौंदर्यशास्त्रानुसार नूतनीकरण करण्यात आले आहे, तसेच फर्निचर, छत आणि फरशीचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
* स्वच्छता सुधारण्यासाठी स्वच्छतागृहांमध्ये विनाइल, ड्युरो वाइप मॅट्स, साबण आणि टिश्यू डिस्पेंसर बसवण्यात आले आहेत.
* एसी कोचच्या आसनांना सीट कव्हर्स लावून अद्ययावत केले आहे; दरवाजाच्या भागात विनाइलची सोय केली आहे.
* छत आणि पॅनल बोर्ड आकर्षक थीमसह पुन्हा डिझाइन केले आहेत;
* एअर फ्रॅग्रन्स डिस्पेंसर बसवण्यात आले आहेत.
ऐतिहासिक वारसा
१ जून १९३० रोजी सुरू झालेली डेक्कन क्वीन ही मुंबई आणि पुणे यांना जोडणारी भारतातील पहिली डिलक्स ट्रेन होती. तिने अनेक गोष्टींमध्ये पुढाकार घेतला: भारतातील पहिली सुपरफास्ट ट्रेन, पहिली लांब पल्ल्याची इलेक्ट्रिक इंजिन असलेली प्रवासी ट्रेन आणि व्हॅस्टिब्युल असलेल्या पहिल्या काही रेल्वेंपैकी हि एक गाडी आहे. ही गाडी 'फक्त महिलांसाठी' डबा आणि 'डायनिंग कार' असलेली पहिली गाडी होती. अनेक दशकांमध्ये, व्हॅक्यूम ब्रेक स्टॉकपासून ते आधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित एलएचबी (LHB) डब्यांपर्यंत तिचा विकास झाला आहे, ज्यामुळे अधिक सुरक्षितता आणि आराम सुनिश्चित झाला आहे.
वारसा महत्त्व
डेक्कन क्वीन ही केवळ एक रेल्वेगाडी नसून, ती एक अशी संस्था आहे जिने पिढ्यानपिढ्या निष्ठावान (जीवलग) प्रवाशांना एकत्र जोडले आहे. आपला समृद्ध इतिहास आणि सतत होणारे आधुनिकीकरण यांमुळे, ती परंपरा आणि नावीन्य यांचा मेळ घालण्याच्या मध्य रेल्वेच्या वचनबद्धतेचे प्रतीक बनून राहिली आहे.
मध्य रेल्वे प्रवासी, रेल्वेप्रेमी आणि सर्वसामान्य जनतेला वारसा, जुन्या आठवणी आणि प्रगतीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी सहभागी होण्याचे निमंत्रण देते.