मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका तरुणाने १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने हल्ला केल्याची भीषण घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यासोबत असलेल्या मित्रालाही मारहाण करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष बनसोड आणि पीडित मुलगी दोघेही बदलापूर येथील रहिवासी असून एकमेकांना ओळखत होते. काही वैयक्तिक कारणांमुळे मुलीने त्याच्याशी संवाद बंद केला होता. याच संतापातून आरोपीने मुलुंडमधील तिच्या कॉलेजजवळ तिला गाठत सोबत आणलेल्या कोयत्याने तिच्या गळ्यावर वार केला. यावेळी तिच्यासोबत असलेल्या मित्रालाही त्याने गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर आरोपीने दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला शस्त्रासह अटक केली आहे. आरोपीवर यापूर्वीही बदलापूरमध्ये विविध गुन्हे दाखल असल्याची माहितीbadlaur समोर आली आहे. सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. केवळ बोलण्यास नकार दिल्यामुळे एवढ्या टोकाचा हल्ला होणे ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अधिक कडक उपाययोजना आणि समाजात जागरूकता वाढवण्याची गरज व्यक्त होत आहे.