मुंबई : शासनाचे ३ कोटी ८२ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) बुडवून नियमबाह्य नोंदणी केल्याप्रकरणी मुंबई ३१ चे सह-दुय्यम निबंधक ईश्वर डी. देवशी यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली. या प्रकरणाची विभागीय चौकशी येत्या तीन महिन्यांत पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आमदार रत्नाकर गुट्टे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे या गंभीर घोटाळ्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. यावर उत्तर देताना महसूलमंत्र्यांनी सरकारची भूमिका मांडली.
जुहू येथील एका मिळकतीचे मुद्रांक शुल्क मुंबई ३१ चे सह-दुय्यम निबंधक ईश्वर डी. देवशी यांनी पदाचा गैरवापर करत वसुली न करता चुकीच्या पद्धतीने रजिस्ट्रेशन केले होते. यामध्ये शासनाचा ३ कोटी ८२ लाख रुपयांचा महसूल बुडाला असल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. या गंभीर दोषारोपामुळे देवशी यांना निलंबित करून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
* विभागीय चौकशी आणि फौजदारी कारवाई : निलंबन ही केवळ प्रक्रियेचा भाग असून चौकशीत अडथळा निर्माण होऊ नये म्हणून ही कारवाई केली आहे. खरा दोष विभागीय चौकशीत सिद्ध होईल. तीन महिन्यांत अहवाल प्राप्त झाल्यानंतर देवशी यांच्यावर केवळ निलंबनच नव्हे, तर त्यापेक्षाही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल," असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. या प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबतही सरकार सकारात्मक विचार करत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
* १०० कोटींची मालमत्ता शासनजमा करणार : घोटाळ्याशी संबंधित असलेल्या मालमत्तेची बाजारपेठीय किंमत सुमारे १०० कोटी रुपये आहे. हे मुद्रांक शुल्क वसूल करण्यासोबतच ती मालमत्ता शासनजमा कशी करता येईल, यादृष्टीने प्रशासकीय कार्यवाही सुरू झाली आहे. बुडालेला ३ कोटी ८२ लाखांचा महसूल सरकार कोणत्याही परिस्थितीत वसूल करेल, असेही महसूलमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.