मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील मालमत्ता धारकांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला असून, आता मिळकतीचे फेरफार (Mutation) करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत या ऐतिहासिक निर्णयाची माहिती दिली. यामुळे मुंबईतील सुमारे ३० लाख नागरिकांना आता सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज भासणार नाही. आतापर्यंत मुंबई शहर आणि उर्वरित महाराष्ट्रातील प्रॉपर्टी कार्डच्या संगणकीय प्रणाली वेगवेगळ्या असल्यामुळे मुंबईत ही सुविधा उपलब्ध नव्हती, मात्र तांत्रिक अडचणी दूर करून सरकारने नागरिकांसाठी डिजिटल द्वार खुले केले आहे.
या नवीन सुविधेमुळे मुंबई शहर जिल्ह्यातील १९ महसूल विभाग आणि ४ नगर रचना योजनांमधील सुमारे २७,८४७ मिळकत पत्रिका (Property Cards) आता mahabhumi.gov.in आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाल्या आहेत. विशेष म्हणजे, खरेदीखत, वारसा हक्क, बक्षीसपत्र, भाडेपट्टा, गहाणखत, रोड सेटबॅक, आरक्षण आणि भूसंपादन अशा तब्बल ४५ प्रकारच्या फेरफारांसाठी ऑनलाइन अर्जाची सोय करण्यात आली आहे. नागरिक आता घरबसल्या अर्ज करू शकतील आणि त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती (Status) देखील ऑनलाइन पाहू शकतील. मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी हा अत्यंत क्लिष्ट वाटणारा प्रकल्प यशस्वीपणे राबवल्याबद्दल मंत्री बावनकुळे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. या डिजिटल क्रांतीमुळे मुंबईतील महसूल प्रशासनात पारदर्शकता येईल आणि कामाचा वेगही वाढेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.