Sunday, March 8, 2026

अंधारात रात्री कसे दिसते?

अंधारात रात्री कसे दिसते?

कथा : प्रा. देवबा पाटील

सीता व नीता त्यांच्या संध्याकाळचा शाळेचा अभ्यास पूर्ण करून मावशीजवळ येऊन बसल्यात. त्यांचा आज गृहपाठ जास्त असल्याने त्यांना तो पूर्ण करायला जरा जास्तच वेळ लागला होता. तरी मावशीजवळ त्या आल्याने मावशीला त्यांना काही चारायचे आहे हे समजले. मावशी त्यांना घेऊन गच्चीवर गेली. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. गप्पा करता करता काळोख पडायला सुरुवात झाली. रस्त्यावरील प्रकाशदिवेसुद्धा चमचम करीत चमकू लागलेत. त्यांच्या तेजस्वी प्रखर प्रकाशाने घराची गच्ची न्हाऊन निघाली. त्या पथदिव्यांच्या चमचम प्रकाशामुळे ज्ञानार्जनात गुंग झालेल्या सीता-नीताचे डोळेसुद्धा एकदम दीपलेत. ते बघून “अशा प्रखर प्रकाशात आपले डोळे का दीपतात मावशी?” असा प्रश्न सीताने विचारलाच.

“आणि उन्हातून घरात आल्यावर आपल्याला अंधारल्यासारखे का होते?” नीतानेही प्रश्न केला. मावशीने सांगण्यास सुरुवात केली, “आपल्या डोळ्यांत शिरणा­ऱ्या प्रकाशाचे नियंत्रण करण्याचे काम डोळ्यांतील भिंगापुढे असलेली बाहुली करत असते. नेहमीच्या सामान्य प्रकाशात ह्या बाहुलीचा एक ठरावीक आकार कायम असतो. ज्यावेळी प्रकाश हा अतिशय तीव्र किंवा प्रखर असतो त्यावेळी या बाहुलीचे छिद्र अगदी लहान होते. कमी प्रकाशात वा रात्री हे छिद्र आपोआप मोठे होऊन जास्त प्रकाश आत घेण्यास मदत करते. बाहुलीचा असा आकार बदलण्यास म्हणजे प्रकाशानुसार लहान-मोठे होण्यास काही कालावधी लागतो. आपण अचानक जेव्हा उन्हात किंवा तीव्र प्रकाशात जातो तेव्हा बाहुलीचा आकार योग्य प्रकारे लहान होईपर्यंत जो वेळ लागतो तेवढ्या वेळात बराचसा प्रखर प्रकाश डोळ्यांत शिरतो आणि डोळे दीपतात.” “तसेच उन्हातून घरात आल्यावरसुद्धा आधी उन्हाने मोठा झालेला बाहुलीचा आकार सुयोग्य प्रकारे लहान होण्यास किंचितसा वेळ लागत असल्याने त्या वेळात आधी मोठ्या असलेल्या बाहुलीला कमी प्रकाश मिळतो. त्यामुळे क्षणभर अंधारल्यासारखे होते.” मावशीने सांगितले. “मग रात्रीच्या अंधारात आपणास कसे दिसते?” नीतानेच विचारले.

“कोणतीही वस्तू आपणास दिसण्यासाठी त्या वस्तूवरून प्रकाशाचे परावर्तन होऊन तो प्रकाश आपल्या डोळ्यांत शिरणे आवश्यक असते. रात्री अंधार असल्याने प्रकाश अतिशय मंद असतो व कधी कधी तर नसतोच. त्यामुळे आपणास अंधारात वस्तू दिसत नाही. पण आपण जर बराच वेळ अंधारात बसलो तर आपल्या डोळ्यांच्या बाहुल्या आपोआप थोड्या मोठ्या होतात. त्यामुळे तेथील प्रकाश मंद असला तरी आपल्या डोळ्यांत त्या प्रकाशाचे बरेचसे किरण शिरतात आणि आपल्याला अंधुकसे दिसायला लागते.” मावशीने उत्तर दिले.

अशाच त्या त्याही दिवशी गच्चीवर गप्पा मारत असताना अचानक सीताचे लक्ष मावशीच्या तळहातांकडे गेले. मावशीचे हात मेंदीने चांगलेच रंगलेले, लाल झालेले होते. ते बघून सीता म्हणाली,‘मावशी तुझे हात तर मेंदीने चांगलेच रंगले आहेत गं. पण मावशी मेंदीची पाने हिरवी असूनही त्यामुळे हातापायांना लाल रंग कसा येतो?”

मेंदीच्या पानांमध्ये लॉर्सोन नावाचे एक रंगद्रव्य असते. मेंदीमुळे हातापायांना येणारा लाल रंग या रसायनामुळे येतो. मेंदीची कोवळी पाने खुडून ती सुकल्यावर त्यांची वस्त्रगाळ पूड तयार करतात. त्याचा लगदा तयार होईल, अशा प्रमाणात त्यामध्ये पाणी व लिंबाचा रस टाकून ते मिश्रण रात्रभर भिजत ठेवतात. त्यामुळे पानांच्या पेशीतून ही रंगद्रव्ये मोकळी होऊन बाहेर पडतात. ज्यावेळी ती भिजवलेली मेंदी हातापायांना लावतात त्यावेळी आपल्या त्वचेच्या वरच्या थरातील पेशींतील रसायनासोबत तसेच नखं व केसांच्या मृत पेशींतील रसायनासोबत

त्या मेंदीतील रंगद्रव्याची प्रकिया होते व त्वचेच्या वरच्या थरातील पेशींना, नखांच्या व केसांच्या मृत पेशींना ते रंगद्रव्य जाऊन चिकटते. त्यामुळे त्यांना लाल रंग प्राप्त होतो.” मावशीने खुलासेवार स्पष्टीकरण दिले. एवढ्यात मावशीला काकांचा फोन आला व त्यांच्या गप्पा बंद झाल्या.

Comments
Add Comment