कथा-रमेश तांबे एका गावात एक उंदीर अगदी मजेत राहात होता. त्याच्या कुटुंबात चार-पाच जण होते. पण गावात स्वच्छतेच्या मोहिमा सुरू झाल्या आणि त्या उंदराची उपासमार होऊ लागली. रोजच्या रोज खाणं-पिणं मिळणं कठीण होऊ लागलं. रोजच्या उपासमारीने उंदराची तब्येत तर अगदीच खालावली. एकदाचं हे गाव सोडून दुसरीकडे सुबत्ता असलेल्या गावात जावं असं त्याला नेहमी वाटायचं. पण घरातल्या सर्वांची आठवण त्याला यायची आणि तो गप्प बसायचा.एकदा उंदीर असाच अन्नाच्या शोधात गावात भटकत होता. एका गल्लीतून फिरता फिरता त्याला कुठून तरी आवाज आला. कोणीतरी उंदीर हाका मारत असल्याचा त्याला भास झाला. त्याने बघून वळून पाहिलं, तर त्याला कोणीच दिसेना. पण पुन्हा आवाज येताच तो काळजीपूर्वक निरखून बघू लागला. तितक्यात त्याला एक बीळ दिसले. त्या बिळातून एक उंदीर त्याला हाका मारत होता. उंदीर त्या बिळाजवळ गेला. बिळातला उंदीर म्हणाला, “अरे मित्रा असा वेड्यासारखा बाहेर काय फिरतोयस! उपासमारीने मरून जाशील. इकडे आत ये बिळात! इथे खूप मजा आहे. खायला भरपूर पदार्थ आहेत. प्यायला भरपूर पाणी आहे. खा, प्या आणि मजा करा असंच इथलं जीवन आहे. तू बिळात माझ्यासोबत राहून तर बघ!”उंदीर विचार करू लागला, खरंच या गावात असाच भटकत बसलो तर नक्कीच उपासमार होईल. त्यापेक्षा या उंदरासोबत बिळात जाऊ आणि मजा करू. मग उंदीर चटकन आत शिरला. बिळाचे तोंड खूपच छोटे होते. पण उंदीर अंगाने खूपच बारीक असल्याने तो सहज आत शिरला. आत शिरताच उंदीर हरखून गेला. तिथे अन्नपदार्थाचे ढीग लागले होते. विविध पेय होती. उंदीर आधाशासारखा पटापटा खाऊ लागला. खाता खाताच त्याने मित्राचे आभार मानले. म्हणाला, “मित्रा बरे झाले, तू मला या संपन्न आणि समृद्ध अशा बिळात आणलेस.” मग काय उंदीर रोज भरपेट खाऊ लागला. आता अन्न शोधण्याची त्याला अजिबात चिंता नव्हती. खायचं-प्यायचं, मजा करायची अन् झोपा काढायच्या असा त्याचा दिनक्रम सुरू झाला. बघता बघता बारीक, हडकुळा, अस्थिपंजर असलेला उंदीर चांगलाच जाडजूड झाला. त्याची तब्येत चांगली सुधारली होती. असेच खाता पिता सहा महिने उलटून गेले. उंदराला आता पळणे तर सोडाच पण नीट चालणेदेखील जमेना. पुढे पुढे त्याला खाण्यापिण्याचीही मजा येईनाशी झाली. आता त्याला घरच्यांची आठवण होऊ लागली. कधी एकदा आपल्या घरी जातो अन् सगळ्यांना भेटतो असे त्याला झाले. मला घरी जायचं असं त्याने आपल्या मित्राला सांगताच मित्र खो खो हसू लागला. तो म्हणाला, “मित्रा इथून सहसा कुणालाच परत जाता येत नाही बरं”!उंदीर म्हणाला, “तू राहा बाबा इथेच. मला मात्र घरी जायचंय.” असं म्हणून उंदीर हत्तीच्या चालीने डुलत डुलत बिळाच्या तोंडापाशी आला. पण हाय रे दैवा! बिळाचं तोंड इतकं छोटं होतं की त्यातून त्याला बाहेर पडणं शक्यच नव्हतं. आता उंदराला तर रडूच कोसळलं. घराच्या आठवणीने तो अगदी व्याकुळ झाला होता. पण समृद्ध आणि संपन्न अशा बिळात जाऊन राहण्याच्या नादात त्याने आपली घरची मंडळी कायमचीच गमावली होती.






