विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील
आपल्या सवंगड्यांसोबत गप्पा करत शिवम त्यांना विज्ञानाची माहितीही सांगत होता.“अरे, आपण लहानपणी नदीवर गेल्यावर खेळायचो ते शंख-शिंपले नद्यांमध्ये व समुद्रात कसे तयार होतात? ह्याची माहिती सांग बरं.” कौशलने आनंदित होत विचारले.शिवम सांगू लागला, “शंख-शिंपले म्हणजे काही नरम अंगाच्या प्राण्यांची कवचं असतात. काही नरम अंगाच्या प्राण्यांच्या शरीरातील काही ग्रंथी पाण्यातून चुनखडी शोषून घेतात व छोट्या छोट्या कणांच्या रूपात तिला आपल्या अंगावर चढवून, साठवून ठेवतात. ती चुनखडी त्यांच्या शरीरावर चिकटून बसते. तिला एक विशिष्टसा आकार प्राप्त होतो. प्राण्याची जसजशी वाढ होत जाते तसतसे हे आवरणसुद्धा वाढत जाते. त्याचा आकार व जाडीसुद्धा वाढत जाते. त्यालाच शंख म्हणतात.”“काही कीटक स्वत:च्या शरीरातून एका विशिष्ट क्षाराचे खूप चिकट असे द्रावण सतत बाहेर सोडत असतात. ह्या द्रावणाचे त्या किड्याच्या शरीराभोवती एकमेकांवर थर बनतात. ह्या थरांची रचना अशी होत राहते की आतमध्ये नवनवीन थर बनत असतात व जुने थर बाहेर राहत असतात. अशी त्यांची पुटेच्या पुटे चढतात व ते सुकून टणक बनतात. त्यांचा शिंपला तयार होतो.”शिवम पुढे म्हणाला, “प्राणी मेला म्हणजे ते शंख-शिंपले रिकामे होतात. त्यांचे रंग हे त्या त्या प्राण्यांच्या ग्रंथींमुळे बनतात. शंखांवर समांतर सुंदर वर्तुळे दिसतात, तर शिंपल्यांवर समांतर रेषा उमटलेल्या दिसतात. काही शंख-शिंपल्यांवर ठिपकेही दिसतात, तर काही एकाच रंगाचे असतात. ते आतून एकदम चकचकीत असतात. ”“त्रिभ्ूज प्रदेश कसे तयार होतात?” कौशलने प्रश्न केला.
“डोंगरामध्ये नदीचा वेग खूप जास्त असतो. सपाट प्रदेशात तो वेग कमी होतो. नदी ही खूप दुरून वाहत येत असते. येतांना ती पूर-महापुरांमध्ये सोबत भरपूर गाळ आणते. काही गाळ तिच्या सभोवतालच्या प्रदेशात पसरतो तर काही तिच्या प्रवाहासोबत वाहत समुद्रापर्यंत येतो. त्यामुळे समुद्राला ती जेथे भेटते त्या मुखाजवळ भरपूर गाळ साचतो. त्या गाळाचे थरावर थर बनतात. ते नदीप्रवाहास अडथळा आणतात. त्या अडथळ्याने प्रवाहास शाखा फुटतात व तेथे नदीला अनेक मुख बनतात. नदीच्या त्या फाट्यांत गाळाचे त्रिकोण बनतात. त्यांनाच त्रिभूज प्रदेश म्हणतात. कोणकोणत्या नदीच्या मुखावर त्रिभ्ूज प्रदेश आहेत हे कुणाला आठवते काय?” शिवमने मित्रांना विचारले.“गंगा, ब्रम्हपुत्रा, कृष्णा, गोदावरी ह्या नद्यांच्या मुखावर त्रिभूज प्रदेश आहेत. ” ज्याला जसे जसे आठवले तसे तसे त्याने सांगितले.“नदीच्या पात्रात दलदल कशी तयार होते? ” अमोलने विचारले.
शिवम म्हणाला, “दलदल ही मुख्यत: नदीच्या मुखापाशी किंवा तलावात अथवा समुद्रकाठी तयार होत असते. ज्या ठिकाणी नदीच्या पात्रात वा तलावाच्या पात्रात एखादा मोठा खड्डा निर्माण होतो व त्या खड्ड्यात भरपूर गाळ साचतो. तेथील तळातील गाळामुळे त्या पाण्याचा नीट निचरा होत नाही. ह्या पाण्यात रेतीचे सूक्ष्म कणही विखुरलेले असतात.पाणी स्थिर झाल्यावर हे वाळूचे कण त्यावर जमा होतात व त्याचा त्यावर पोपडा तयार होतो. कधीकधी त्या पोपड्यावर बारीक सारीक खुरट्या क्षुद्र वनस्पतीही उगवतात. वर मातीसारखा पापुद्रा व खाली पाणीमिश्रित गाळ अशी ती दलदल तयार होते. पाहणाऱ्याला त्याखाली पाणी व गाळ असेल याचा अंदाज येत नाही व त्यावर पाय पडताच व्यक्ती वा जनावर त्या दलदलीत फसते. त्याने एक पाय वर उचलण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा दुसरा पाय जास्त खाली फसतो. अशी ती व्यक्ती वा जनावर त्या दलदलीत जास्त जास्त फसत जाते. दलदल अति खोल असल्यास त्यातून वाचण्याची शक्यता फार कमी असते.”






