Saturday, June 27, 2026

विकतची किर्ती नको

विकतची किर्ती नको

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर

आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला प्रसिद्धी, मान-सन्मान आणि किर्ती हवी असते; परंतु खरी किर्ती ही पैशाने विकत घेता येत नाही. पैसा खर्च करून मिळवलेली प्रसिद्धी काही काळ टिकते, पण चांगल्या कर्मातून मिळालेली किर्ती आयुष्यभर लोकांच्या मनात राहते.किर्ती मिळवण्यासाठी प्रामाणिकपणा, परिश्रम, निष्ठा आणि समाजहिताची भावना आवश्यक असते. जो व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने, चांगल्या स्वभावाने आणि सेवाभावी वृत्तीने लोकांची मने जिंकतो, त्याची किर्ती आपोआप वाढते. उलटपक्षी, पैशाच्या बळावर किंवा खोट्या मार्गाने मिळवलेली प्रसिद्धी तात्पुरती असते. सत्य समोर आल्यानंतर अशी किर्ती नष्ट होते.इतिहासात अनेक थोर व्यक्तींनी आपल्या कार्यातून अमर किर्ती मिळवली. त्यांनी कधीही प्रसिद्धीसाठी काम केले नाही; समाजसेवा आणि कर्तव्यपूर्ती हेच त्यांचे ध्येय होते. त्यामुळे आजही लोक त्यांना आदराने स्मरतात .म्हणूनच आपण किर्तीच्या मागे न धावता चांगल्या कार्याच्या मागे धावले पाहिजे. सत्कर्म, प्रामाणिक प्रयत्न आणि उत्तम चारित्र्य यांमधून मिळणारी किर्तीच खरी आणि चिरंतन असते. म्हणूनच “विकतची किर्ती नको, कर्तृत्वातून मिळालेली किर्ती हवी” हा संदेश प्रत्येकाने आपल्या जीवनात आचरणात आणावा. देहे त्यागिता किर्ती मागे उरावी । मना सज्जना हेचि क्रिया धरावी । मना चंदनाचे परी त्वां झिजावे । परी अंतरी सज्जना नीववावे ॥ - समर्थ रामदास. माणसाने मोठेपणाचा हव्यास धरू नये. पण त्याचबरोबर आपली अपकिर्ती होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. सर्वांच्या मते किर्ती दोन प्रकारची असते. एक आपल्या हयातील किर्ती आणि दुसरी आपल्या मृत्यूनंतर शिल्लक राहणारी किर्ती. राजकीय पुढारी, नट-नट्या, खेळाडू, उद्योगपती यांची किर्ती त्यांच्या हयातीत होते. त्यांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी लोक त्यांना विसरून जातात. मात्र साधू-संतांची किर्ती त्यांच्या पश्चातदेखील शिल्लक राहते. उलट अनुभव असा आहे की, साधू-संतांना ते हयात असताना लोकांनी त्रासच दिला. त्यांच्या पश्चात त्यांची किर्ती झाली. उद्योगपती, पुढारी, नट-नट्या हे आपली किर्ती करून घेतात. समाज, साधुसंत आणि खरे देशभक्त यांना डोक्यावर घेतो. मृत्यूनंतरही त्यांना अमर करतो. पंढरपुरात संत नामदेव हे असेच एक थोर भक्त होऊन गेले. ते हयात असताना प्रारंभी लोकांना त्यांचे महत्त्व कळले नाही. पण प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्या हातचा नैवेद्य ग्रहण करीत असे. संत नामदेव कीर्तन करू लागले. त्यांचा ज्ञानदीप जगभर प्रकाशित होऊ लागला. जनाबाईसारख्या थोर स्त्रिया दळताना आणि कांडताना नामदेवांचे अभंग म्हणू लागल्या. नामदेवांना ८० वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य लाभले. ते भारतभर हिंडले. जनमतेत लोकांवर त्यांचा विशेष प्रभाव पडला. नामदेवांच्या समाधीनंतर २०० वर्षांनी शीख लोकांनी त्यांचे काही अभंग ‘ग्रंथसाहिब’ या त्यांच्या धर्मग्रंथात समाविष्ट केले. याला म्हणतात देहत्यागानंतरची किर्ती. आज नामदेवांची १०० हून अधिक मंदिरे पंजाबमध्ये पाहावयास मिळतात. आजही पंजाबमधील नामदेवांचे शेकडो अनुयायी आषाढी एकादशीला पंढरीची वारी करतात. नामदेवांची ७००वी पुण्यतिथी होती तेव्हा पंजाबमधील अनेक मंदिरांत नामदेवांच्या गाथेची पारायणे झाली. ‘निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई-एकनाथ-नामदेव-तुकाराम’ हे संतपंचक म्हणजे महाराष्ट्राचे स्फूर्तिमंत्र झालेले आहेत. या सर्व संतांची किर्ती त्यांच्या देहावसनानंतर झाली. आज तुकाराम महाराजांचे अभंग अनेकांच्या अभ्यासाचा विषय ठरले. तुकारामांच्या गाथेच्या हजारो प्रती दरवर्षीविकल्या जातात.समर्थांना खरी किर्ती अपेक्षित आहे आणि खरी किर्ती नेहमी देहत्यागानंतर होते. आज हजारो वर्षांनंतर रामकथा आणि कृष्णकथा हजारो भारतीयांचा जीव की प्राण झाली आहे. यालाच म्हणतात देहत्यागानंतरची किर्ती.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा