‘तिघी’ चित्रपटासाठी निर्माती म्हणून संधी : नेहा पेंडसे

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल 


नेहा पेंडसे-बायस या चतुरस्त्र अभिनेत्रीने अभिनयाचे नाणं खणकावत अभिनयाच्या क्षेत्रात बाजी मारली आहे. एक सशक्त अभिनेत्री असल्याचे 'तिघी' या चित्रपटातून तिने दाखवून दिले आहे. अभिनेत्री व निर्माती अशा एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आलेल्या आहेत. आई व तिच्या दोन मुलीच्या भावविश्वाची गोष्ट सांगणारा 'तिघी' हा चित्रपट नुकताच रिलीज झालेला आहे.


नेहाचा जन्म मुंबईचा, अंधेरीतील सेंट लुविस कॉन्व्हेन्ट हायस्कूलमध्ये तिचे शालेय शिक्षण झाले. लहानपणी ती लाजाळू होती, त्यामुळे तिच्या आईने तिला अभिनयाच्या शिबिरामध्ये पाठविले. तेथून तिला अभिनयाची गोडी लागली. शाळेत असतानाच तिला 'कॅप्टन हाऊस' ही मालिका मिळाली. अजय सिन्हा दिग्दर्शित 'हसरतें' या मालिकेतील तिची ऊर्जा या अवैध मुलीची भूमिका खूप गाजली. आजही प्रेक्षक तिला ऊर्जा या नावाने ओळखतात. काळाच्या पुढील विचाराची ही विवाहबाह्य संबंधाची मालिका होती. त्यानंतर तिला कामामागून कामे मिळत गेली. सुषमा कौल या कॉर्डिनेटरमुळे तिला 'सोनथम' हा पहिला तेलुगू चित्रपट मिळाला. दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्याचा चांगला अनुभव तिला मिळाला. तेथील शिस्त, काम करण्याची पद्धत, तेथील संस्कृती तिला अनुभवता आली. त्यानंतर तिने तेलुगू, मल्याळम, कन्नड भाषेतील चित्रपट केले. मे आय कम इन मॅडम?, भाभीजी छत पर है या मालिकेमध्ये काम केले. प्यार कोई खेल नही, नटसम्राट, बाळकडू, देवदास या चित्रपटांमध्ये काम केले. बिग बॉस सीझन १२ मध्ये देखील ती होती. त्यानंतर तिने 'जून' हा चित्रपट निर्माण केला. त्या चित्रपटाला नॅशनल अॅवॉर्ड मिळाले आणि त्यासाठी तिला फिल्मफेअर अॅवॉर्ड देखील मिळाले होते. कोरोनाच्या काळात हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला.


‘तिघी’ चित्रपटाची निर्मिती व त्यात अभिनय करण्याचे काम नेहाने केले आहे. या चित्रपटाची दिग्दर्शिका जिजिविषा काळे ही नेहाची मैत्रीण आहे. तिने या चित्रपटाचे कथानक नेहाला सांगितले, नेहाला या चित्रपटाची कथा आवडली व तिने या चित्रपटात काम करण्याचे आणि चित्रपटाची निर्मिती करण्याचे शिवधनुष्य उचलले.


तिघी चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील असे विचारले असता ती म्हणाली की, या चित्रपटामध्ये मी स्वाती नावाची व्यक्तिरेखा साकारित आहे. मी घरातील मोठी बहीण असते. समजूतदारपणाचं एक ओझं माझ्यावर असतं. सध्याच्या परिस्थितीत माझ्या विरुद्ध सगळ्या गोष्टी होत असतात, माझे नवऱ्याशी नीट पटत नाही, ऑफिसमध्ये मला बॉस त्रास देत असतो, छोट्या बहिणीशी माझं पटत नसतं, आईपासून मी दुरावलेली आहे. अशा त्रासदायक परिस्थितीतून माझा प्रवास सुरू असतो. मी या परिस्थितीत कशी येते. मला आई व बहीण त्या परिस्थितीतून कशा बाहेर काढतात? घरात माझा वाढलेला दुरावा कसा कमी होतो? त्यासाठी कशी परिस्थिती निर्माण होते हे सारे या चित्रपटात पाहायला मिळेल.


या चित्रपटाची ती निर्माती देखील आहे, त्यामुळे तिच्या मनाप्रमाणे चित्रपट तयार झाला आहे का असे विचारल्यावर ती म्हणाली की, या चित्रपटाची दिग्दर्शिका जिजिविषा काळे हिची कथा होती. माझ्या अपेक्षेपेक्षा चित्रपट खूप चांगला झाला आहे. ती दिग्दर्शनात अनुभवसंपन्न असल्याने चित्रपटाच्या कथेकडे, त्यातील पात्रांकडे वेगवेगळ्या दृष्टीने पाहू शकते, ही तिची जमेची बाजू आहे असे मला वाटते. कलाकारांकडून अतिशय संवेदनशील पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात ती काम काढून घेते.


'आईचे घर हजार आठवणी' ही या चित्रपटाची टॅग लाईन आहे. तुमच्या आईच्या घरातील आठवणी कोणत्या आहेत असे नेहाला विचारले असता ती म्हणाली की, मला वाटतं माझ्या आईच्या घरामध्ये किचन ही नेहमी केंद्रस्थानी राहिलेले आहे. किचनमध्ये नेहमी काही ना काही पदार्थ बनत असतात, त्या पदार्थांचा सुगंध दरवळत असतो. घरामध्ये हॉल असूनदेखील आमच्या महत्त्वाच्या चर्चा किचनमध्ये झालेल्या आहेत.


अभिनेत्री आणि निर्माती यांमध्ये कोणता फरक जाणवतो असे विचारल्यावर नेहा म्हणाली की, अभिनेत्रीचा सहभाग हा तिच्या भूमिकेपुरता असतो; परंतु निर्मात्याचा सहभाग हा चित्रपट निर्माण होण्यापूर्वीपासून, चित्रीकरणादरम्यान, चित्रपट पूर्ण झाल्यानंतर देखील असतो. चित्रपट रिलीज करण्यात देखील निर्मात्यांचा सहभाग असतो. निर्मात्याने केलेली चांगली निर्मिती पडद्यावर दिसली पाहिजे. तिघी चित्रपटामध्ये तीन गाणी आहेत जी जितेंद्र जोशींनी लिहिली आहेत, अद्वैत यांनी गीतांना संगीत दिले आहे. प्रियंका बर्वे, शरयू दाते यांनी ही गाणी गायली आहेत. तिघी हा चित्रपट टर्निंग पॉइंट असल्याचे नेहाने सांगितले.


खूप वर्षांनी एक चांगला चित्रपट ती घेऊन आली आहे. या चित्रपटानंतर प्रेक्षकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, असे तिला वाटते. आतापर्यंत ग्लॅमरस, कॉमेडी भूमिका तिने केल्या आहेत. या चित्रपटानंतर प्रेक्षकांनी तिच्याकडे सशक्त अभिनेत्री म्हणून पाहिले पाहिजे, अशी इच्छा तिने व्यक्त केली.

Comments
Add Comment

‘महोगाथा’चा प्रयोगशील अध्याय...!

राजरंग : राज चिंचणकर मराठी रंगभूमीवर विविध प्रकारच्या नाटकांची प्रयोगशील मांडणी होत असते. मनोरंजनाच्या सोबतच

गोव्याच्या कलाभूमीत उगवला झारखंडचा धरती आबा

भालचंद्र कुबल : पाचवा वेद आजवर भारंगम या नाट्य महोत्सवासाठी तीनदा जाणे झाले; परंतु यंदाच्या टूरचे महत्त्व थोडे

मायाचा भावनिक मुक्त प्रवास

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  एकदा शूटिंगच्या वेळी ज्येष्ठ अभिनेते स्व. विक्रम गोखलेजी एका दिग्दर्शकाला

नाट्य महोत्सवाचे पडघम...

मराठी नाट्यसृष्टीत अनेक नाटकांचे महोत्सवी प्रयोग होत असतात. त्याचबरोबर विविध नाट्य महोत्सवही आयोजित केले

मराठी सिनेमांची रंगपंचमी...!

राजरंग : राज चिंचणकर  रुपेरी पडद्यावर मोठ्या उत्साहात झळकणाऱ्या मराठी सिनेमांनी वर्षानुवर्षे चालत आलेली आपली

दिल्लीत झळकली मराठी पताका

पाचवा वेद : भालचंद्र कुबल २५ व्या भारत रंग महोत्सवाचे आयोजन दिनांक २७ जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ रोजी