गोव्याच्या कलाभूमीत उगवला झारखंडचा धरती आबा

भालचंद्र कुबल : पाचवा वेद


आजवर भारंगम या नाट्य महोत्सवासाठी तीनदा जाणे झाले; परंतु यंदाच्या टूरचे महत्त्व थोडे वेगळे होते. पंचवीसावा भारंगम यंदा आंतरराष्ट्रीय होता त्यामुळे यंदाचा प्रेक्षकवर्ग संमिश्र होता. त्यातही आमचे हिंदी घासीराम कोतवाल भारतभरात अनेक दिग्गजांनी केले असल्यामुळे, नवीन असे यात काय बघायला मिळणार? ही उत्सुकता बाळगणारे अधिक होते. दोन-तीन दिवस नाट्य व्यवस्थापनासाठी आधीच उत्सवस्थळी गेल्यामुळे रात्री इतर राज्यांची काही उत्तमोत्तम नाटके पाहायला मिळाली. गोव्याच्या कला अकादमीने सादर केलेले ‘धरती आबा’ हे नाटक पाहण्याचा योग आला. भारतात भरवल्या जाणाऱ्या नाट्य महोत्सवांमध्ये गाजणाऱ्या नाटकांपैकी हे एक नाटक आहे.


लोककलेसाठी मंच उपलब्ध करून देण्यासाठी लोकरंग महोत्सव देखील भारंगममध्ये सामील करून घेण्यात आला होता. त्यातील हे नाटक म्हणजे बिरसा मुंडा या आदिवासी नेत्याचा जीवनपट आहे. बिरसा मुंडा हे १९व्या शतकातील एक स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंडमधील उलिहातू नामक छोट्याशा खेड्यात झाला. बिरसा मुंडा हे मुंडा जमातींपैकी होते. त्यांनी बालपणी जर्मन मिशनरी शाळेत शिक्षण घेतले, पण लवकरच त्यांनी आदिवासींच्या दुर्दशेकडे लक्ष केंद्रित केले. ब्रिटिश राजवटीखाली जमिनींचे हक्क आणि स्वातंत्र्याविषयी आदिवासींच्या योगदानाबाबत बिरसा यांनी 'उलगुलान' नावाचे शस्त्रक्रांतीचे आंदोलन चालवले, ज्यामध्ये ब्रिटिश आणि जमीनदारांविरुद्ध लढा दिला. हिंदू, ख्रिश्चन आणि आदिवासी धर्मांमधल्या तत्त्वांचा समावेश करून 'बिरसाईट' धर्माची स्थापना केली, ज्याने आदिवासींमध्ये एकता निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वामुळे १८९९-१९०० मध्ये मोठे विद्रोह झाले.


बिरसा मुंडा यांना 'धरती आबा' (पृथ्वीचा बाप) म्हणून पूजले जाते. त्यांच्या आंदोलनामुळे १९०८ चा छोटा नागपूर टेनन्सी कायदा आला, ज्याने आदिवासींचे जमीन हक्क मजबूत झाले. १५ नोव्हेंबर हा 'जनजाती गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो आणि ९ जून १९०० रोजी रांची जेलमध्ये त्यांचे निधन झाले. या त्यांच्या नाट्यमय जीवनाचा आढावा म्हणजे प्रेरणादायी आविष्कारच ठरतो आणि कला अकादमी गोव्याच्या रेपरटरीच्या विद्यार्थ्यांनी हा नाट्याविष्कार घडवून आणला.


‘धरती आबा’ नाटक बिरसाचा निसर्गाशी असलेला दृढ संबंध, त्याची आध्यात्मिक शक्ती आणि न्याय व समानतेचे दृष्टिकोन यांचाही शोध घेते. त्याचे जीवन जरी अल्पायुषी असले तरी, त्याच्या धैर्याने आणि बलिदानाने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील इतिहासावर खोल ठसा उमटवला गेला. त्याची कथा पिढ्यानपिढ्या सत्य, सन्मान आणि जमिनी-संस्कृतीच्या संरक्षणासाठी उभे राहण्यास प्रेरित करते. साध्या कथानकातून, संगीत आणि नाट्यमय क्षणांद्वारे 'धरती आबा' एका तरुण आदिवासी शहिदाची शक्तिशाली कथा जिवंत करते, ज्याचा आवाज संपूर्ण समुदायाचा आवाज बनला.


हे नाटक बिरसा मुंडाच्या १५० व्या जयंतीनिमित्त या वर्षात सादर करण्यात येत आहे. त्यांचे जीवन, संघर्ष आणि लोकांबद्दलची निष्ठा अत्यंत प्रेरणादायी आहे. देशाच्या दुर्गम आदिवासी भागातून त्यांनी धैर्याने आणि नेतृत्वाने अन्यायाविरुद्ध मोठी चळवळ उभी केली. त्याची कथा देशभर सांगितली जावी आणि स्मरणात ठेवली जावी, हे नाटक निवडी मागचे आणखी एक महत्त्वाचे कारण होते, तसेच कला अकादमीचा रेपर्टरी विभाग काही वर्षे बंद होता. रेपर्टरी पुन्हा सुरू करताना वाटले की बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित नाट्यापेक्षा अधिक अर्थपूर्ण आणि शक्तिशाली प्रयोगाशिवाय पर्याय नाही. धरती आबा, सशक्त कथानक, धैर्य आणि सामाजिक न्यायाचा प्रखर संदेश देते, असे या नाटकाचे दिग्दर्शक सुशांत नायक यानी सांगितले. आदिवासी कल्याण संचालनालयाच्या सहकार्याने बिरसा मुंडाला अभिवादन म्हणून विशेष तयार करण्यात आलेल्या या नाट्यप्रयोगास महत्त्व असून तो आदिवासी इतिहास आणि संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करतो. अप्रुप आणि आश्चर्य याच गोष्टीचे वाटत राहतं की व्यावसायाभिमुख असणारी नाटके भारंगमसारख्या नाट्यप्रायोगिक चळवळीतून अदखलपात्र ठरतात. आजही मराठी नाटक जगाच्या पातळीवर ग्रेट म्हटले जाते ते अशाच कारणांसाठी की अनेक प्रयोग सर्वात प्रथम याच रंगभूमीवर घडविले जातात. भारंगम अशा प्रयोगांना दर्जा व संधी प्राप्त करुन देते.


सुशांत नायक हा गोव्याचा तरुण तडफदार दिग्दर्शक त्याच्या वैविध्यपूर्ण दिग्दर्शनामुळे ओळखला जातो. आजवर त्याने दिग्दर्शित केलेली अनेक नाटके विविध महोत्सवातून गाजली आहेत. नाटकाची उत्तम जाण आणि अभ्यास आणि नाटकाप्रती प्रामाणिक असलेल्या या दिग्दर्शकाने नटसमुदाय अत्यंत क्रिएटिव्ह लेवलने हाताळलेला दिसून येईल.
कला अकादमीच्या रंगमेळ या संस्थेने ‘धरती आबा’ प्रेक्षणीयरारीत्या सादर करण्यामागे, कलाकारांतर्फे शांताराम पवार, अजित कामत, माधुरी शेटकर, मयूर मयेकर तथा प्रेमानंद पोळे आदी पंचवीस कलाकारांची साथ लाभली आहे, उत्तम प्रकाशयोजना तेजस खेडेकर यांनी केली असून रंगभूषा सागर हळदोणकर यांची दखल या प्रयोगानिमित्ताने घेणे मला अत्यंत गरजेचे वाटते.


गोव्याच्या मातीने झारखंडच्या बिरसा मुंडा या क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिकाची घेतलेली नाट्यमय दखल नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. योगायोगाने पाहाण्याची संधी आलीच, तर गमावता न येणारा हा ‘धरती आबा’...!


Comments
Add Comment

मुंबईला आल्यावर ‘कलावैभव’मध्ये काम करण्याची मिळाली संधी : सचिन देशपांडे

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  सचिन देशपांडे यांनी अभिनयाच्या क्षेत्रात आपले स्थान भक्कम केले आहे. गेली पंचवीस

रंगकर्मींच्या नाट्यकट्ट्याची मुहूर्तमेढ...!

राजरंग : राज चिंचणकर नाट्यसृष्टीत विविध उप्रक्रमांची पायाभरणी केली जाते आणि यातले काही उपक्रम सातत्याने सुरु

व्याधींच्या आधीची समाधी

भालचंद्र कुबल : पाचवा वेद आमच्या पुष्पा भावे मॅडम नेहमी जयंताची उदाहरणे द्यायच्या, जयंता म्हणजे जयंत पवार..! मला

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेने येसूबाई म्हणून ओळख दिली

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  इतिहासाची साक्ष आणि वर्तमानाचा संघर्ष यांची सांगड घालणारा 'भिडेवाडा' हा चित्रपट

सरपंच-उपसरपंचांची जुगलबंदी रंगणार

शशांक शेंडे आणि ओंकार भोजने आमने-सामने गावच्या राजकारणात सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोक-झोक नेहमीच चर्चेचा

कलाकारांची चैतन्यमय गुढी...

राजरंग : राज चिंचणकर पली संस्कृती, परंपरा आपल्या सण आणि उत्सवांत अधिक उजळून निघते. नववर्षाचा शुभारंभ करत चैतन्य