Saturday, March 7, 2026

Gas Cylinder Price Hike :देशभरात गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ

Gas Cylinder Price Hike :देशभरात गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ

- घरगुती आणि कमर्शिअल दोन्हीचे दर वाढले

मुंबई : देशभरात घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही गॅस सिलेंडरच्या दरात आज, शनिवारपासून (७ मार्च २०२६) दरवाढ करण्यात आली आहे. घरगुती वापराचा १४.२ किलोच्या सिलेंडरचे दर ६० रुपयांनी वधारले असून व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किंमतीत ११५ रुपयांची वृद्धी करण्यात आली आहे.

देशात घरगुती स्वयंपाक गॅस सिलेंडरच्या किमतीत ६० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीतही ११५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीचा थेट परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट आणि लहान व्यावसायिक आस्थापनांवर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये १४.२ किलो घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ८५३ रुपयांवरून ९१३ रुपये झाली आहे. मुंबईमध्ये घरगुती सिलेंडरची नवीन किंमत ९१२.५० रुपये झाली असून पूर्वी ती ८५२.५० रुपये होती. तर चेन्नईमध्ये किंमत ८६८.५० रुपयांवरून ९२८.५० रुपये झाली आहे. हे सुधारित दर आजपासून लागू झाले आहेत.

यासोबतच व्यवसायांमध्ये वापरल्या जाणाऱ्या १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये गॅस सिलेंडरची किंमत १७६८.५० रुपयांवरून १८८३ रुपये झाली आहे. तर मुंबईमध्ये १७२०.५० रुपयांवरून १८३५ रुपये झाली आहे. तसेच कोलकात्यात सिलेंडरचे दर १८७५.५० रुपयांवरून १९९० रुपये झाले असून चेन्नईमध्ये १९२९ रुपयांवरून २०४३.५० रुपये झाली आहे.यापूर्वी एप्रिल २०२५ पासून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे या ताज्या दरवाढीचा घरगुती ग्राहक तसेच व्यावसायिक वापरकर्त्यांवर मोठा आर्थिक परिणाम होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment