‘महाराष्ट्र ज्ञान सभा-2026’राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
नागपूर : वैश्विक ज्ञानाचे भारतीयीकरण व भारतीय ज्ञानाचे वैश्विकरण करणे, हेच नव्या शैक्षणिक धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. केवळ ऐतिहासिक बाबींचा गौरवपूर्ण उल्लेख करुन आम्ही महान होणार नाही, तर यासह वर्तमान आणि भविष्याची वैश्विक आव्हाने लक्षात घेऊन त्यानुसार आमच्या शैक्षणिक पद्धतीला दिशा द्यावी लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज येथे केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आज जग अत्यंत वेगाने पुढे जात आहे. पहिली औद्योगिक क्रांती 1760 मध्ये आली होती. त्यानंतरच्या आलेल्या तीन औद्योगिक क्रांतींचा काळ हा सुमारे अडीचशे वर्षांचा आहे. मात्र, मागील पंधरा वर्षांतच तीन औद्योगिक क्रांतींचा अनुभव जगाने घेतला आहे. बदलांची गती लक्षात घेतली नाही, तर आम्ही मागे राहू शकतो. या क्रांतीला गती देणारे ‘एआय’आणि ‘डीप टेक्नॉलॉजी’च्या विकासात भारतीयांचे अत्यंत मोलाचे योगदान राहिले आहे. आम्हाला शैक्षणिक धोरणातून असे मानव संसाधन घडवायचे आहे, ज्यात व्यक्तीमध्ये सर्वंकष विकासासह नैतिक व व्यावसायिक गुणांचे रोपणही अपेक्षित आहे. भौतिक, नैतिक, शारीरिक क्षमतेसह व्यावसायिक म्हणून ती व्यक्ती देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणारीही ठरावी, अशी अपेक्षा आहे. जागतिक ज्ञान आणि भारतीय ज्ञान व्यवस्थेचा मेळ साधणारी आणि जागतिक आव्हानांचा सामना करणारी शिक्षण पद्धती आम्हाला विकसित करायची आहे, याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष वेधले.
मुख्यमंत्री म्हणाले, साठ टक्के नोकऱ्यांचे स्वरुप येत्या एक हजार दिवसांमध्येच बदलणार आहे. डीप टेक व एआय तंत्रज्ञान सर्व क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल घडवत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढेल, असा याचा अर्थ नाही. देशात संगणक क्रांती आली, त्यावेळीही अशीच चर्चा सुरु झाली होती. मात्र, आम्ही त्या क्षेत्रातही आमचा ठसा उमटविला होता. तंत्रज्ञान कधीच थांबत नाही. अशावेळी तंत्रज्ञानासोबत आपणही पुढे जाण्याची गरज आहे. विद्यापीठे तसेच शिक्षकांनी आजच्या काळात कुठले विषय सुसंगत व अनुरूप आहेत, याचाही विचार करण्याची गरज आहे. पंधरा वर्षात तीन औद्योगिक क्रांती येणार असतील, तर समाजात काहीही स्थायी राहू शकत नाही. प्रत्येकाला नव्या पद्धती स्विकाराव्या लागतील व शैक्षणिक क्षेत्र त्यासाठी अनुकूल करून घ्यावे लागेल आणि ज्ञानाचा प्रवाह पुढे न्यावा लागेल, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
विदेशी विद्यापीठांना आम्ही अनुकूल नव्हतो, असाही एक काळ होता. कारण त्यावेळी आम्ही त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नव्हतो. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. नवी मुंबईत आम्ही एज्युसिटी विकसित करत आहोत. त्यात अनेक विदेशी विद्यापीठाचे शिक्षण कमी खर्चात घेण्याची संधी आमच्या मुलांना उपलब्ध होणार आहे. आमच्या विद्यापीठांनीही या स्पर्धेत उतरून शिक्षणाचा तो स्तर गाठायला हवा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्याचप्रमाणे ‘बेस्ट प्रॅक्टीसेस ऑफ गोंडवाना युनिव्हर्सिटी’ या पुस्तिकेचे प्रकाशनही याप्रसंगी पार पडले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मनाली क्षीरसागर यांनी आभार मानले. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत देशभरातील शिक्षण व उद्योग क्षेत्राशी निगडित तज्ज्ञ आणि प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. नव्या शैक्षणिक धोरणाच्या संदर्भातून विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण या थीमवर आधारित महाराष्ट्र ज्ञान सभेचे हे आयोजन होत आहे.






