Saturday, April 18, 2026

Uttar Pradesh: मेड असल्याचे सांगत महिलेने केले घर साफ; स्त्रीला बेशुद्ध करून...

Uttar Pradesh: मेड असल्याचे सांगत महिलेने केले घर साफ; स्त्रीला बेशुद्ध करून...
उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडातील एका सोसायटीत वृद्ध महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्या घरात चोरी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला मोलकरीण म्हणून कामावर आली, तिने त्या वृद्ध महिलेला बेशुद्ध करुन तिचे मंगळसूत्र, रोकड आणि घरातील इतर वस्तू चोरून पसार झाली. ही घटना बिसरख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आम्रपाली किंग्स वूड गोल्ड होम्स सोसायटीमध्ये घडली, जिथे शांती मिश्रा नावाची महिला आपल्या सुनेसोबत राहते. असे सांगितले जात आहे की, तिची सून बऱ्याच काळापासून मोलकरणीच्या शोधात होती.

नेमकं काय घडलं?

एक स्त्री शुक्रवारी दुपारी शांती मिश्रा यांच्या फ्लॅटवर आली. जेव्हा शांती मिश्रा यांनी दरवाजा उघडला, तेव्हा त्या स्त्रीने सांगितले की ती मोलकरीण म्हणून कामावर आली आहे. त्यावेळी शांती मिश्रा यांनी तिला संध्याकाळी यायला सांगितले. तसेच त्यांची सून घरी नाही असेही सांगितले. त्याचवेळी, त्या स्त्रीने तिच्या हातात काहीतरी घेतले आणि शांती मिश्रा यांना त्याचा वास घ्यायला लावला, ज्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. शांती मिश्रा यांनी सांगितले की, त्यानंतर त्या स्त्रीने फ्लॅटमध्ये चोरी करण्यास सुरुवात केली. रोख रक्कम, त्यांचे मंगळसूत्र आणि इतर वस्तू चोरल्या.

वृद्ध महिलेला बेशुद्ध करुन केली चोरी

घटनेनंतर सुमारे तासाभराने त्या वृद्ध महिलेला शुद्ध आली. तेव्हा तिच्या लक्षात आले की घरातील सामान विखुरलेले होते आणि अनेक वस्तू चोरीला गेल्या होत्या. त्यानंतर तिने आपल्या शेजाऱ्यांना आणि नंतर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्या वृद्ध महिलेने त्यांना संपूर्ण घटना सांगितली. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते जवळपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. बिसरख पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिलेची सून घरकामात मदत करण्यासाठी मोलकरणीच्या शोधात होती. याच संदर्भात, एक महिला त्यांच्या फ्लॅटवर आली आणि तिने हा गुन्हा केला. गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा