‘महोगाथा’चा प्रयोगशील अध्याय...!

राजरंग : राज चिंचणकर


मराठी रंगभूमीवर विविध प्रकारच्या नाटकांची प्रयोगशील मांडणी होत असते. मनोरंजनाच्या सोबतच काही ठोस विचार मांडण्याचा वसाही काही नाट्यकृतींनी घेतलेला दिसतो. याच मांदियाळीत आता 'महोगाथा' या नवीन नाटकाचे नाव घ्यावे लागेल. साहित्यक्षेत्रात स्वतःचा अमूल्य ठसा उमटवणाऱ्या प्रख्यात लेखिका महाश्वेतादेवी यांच्या तीन कथांवर आधारित हे नाटक आहे. 'काली बिल्ली प्रॉडक्शन्स' या संस्थेची निर्मिती असलेले हे नाटक सावित्री मेधातूल यांनी लिहिले असून, या नाटकाची निर्मितीही त्यांनी केली आहे. मंगेश सातपुते हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. नाटकाचे नेपथ्य व वेशभूषा अशी जबाबदारी सुमित पाटील यांनी सांभाळली आहे. नाटकाला विक्रम होता यांनी संगीत दिले असून, प्रकाशयोजना विलास हुमणे यांनी केली आहे. या नाटकात हृदयनाथ जाधव, विक्रम होता, मुक्ती साधना आणि सावित्री मेधातूल हे चार कलाकार भूमिका साकारत आहेत. १३ मार्च रोजी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये 'महोगाथा'चा प्रयोगशील अध्याय लिहिला जाणार आहे.


लोककला, परंपरा, संस्कृती आदींची कास धरत विविध कलाकृतींना रंगमंचावर आणणाऱ्या, नाट्य माध्यमातून चाकोरीबाहेरचे काही सांगू पाहणाऱ्या, लोककला व लावणीच्या अभ्यासक म्हणून खास ठसा उमटवणाऱ्या रंगकर्मी सावित्री मेधातूल यांनी आता रंगभूमीवर पुढचे पाऊल टाकताना 'महोगाथा' हा अध्याय हाती धरला आहे. अर्थात, त्यांचे नाटक म्हणजे काहीतरी अनोखा प्रकार असणार, याची नाट्यरसिकांना खात्री असते आणि नवरसिकांना त्यांचे नाटक अनुभवताना नवीन काही गवसल्याची जाणीव होत राहते. आता तर या नाटकाचे 'महोगाथा' हे शीर्षकच उत्कंठा वाढवणारे ठरले आहे.


'महोगाथा' या वेगळ्या धाटणीच्या नाटकाविषयी सावित्री मेधातूल यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणतात, "आपल्याकडे जे टिपिकल डायलॉग असतात त्यापेक्षा वेगळे म्हणजे आपल्याकडे जशा गोष्टी सांगितल्या जातात; तसे वेगवेगळे प्रकार आम्ही या नाटकात वापरलेले आहेत. यात लाईव्ह गाणी गायलेली आहेत, संगीत आहे. खूप एनर्जेटिक आणि थॉट प्रोव्होकिंग असे हे नाटक आहे. मी लेखिका म्हणून अधिकृतपणे प्रथमच नाटक लिहिले आहे. आज आपल्या आजूबाजूला जे काही घडत आहे; त्या सगळ्याला एक रिस्पॉन्स म्हणून हे नाटक आहे. चांगला ऑडियन्स हा नेहमीच मनोरंजन आणि त्यासोबतच काहीतरी विचारप्रवृत्त करायला लावणारी कलाकृती अनुभवण्यात इंटरेस्टेड असतो, तर तशी ही कलाकृती आहे.


'महोगाथा' हे संथालीमधले वॉर क्राय आहे, म्हणजे लढाईसाठी जाताना दिली जाणारी आरोळी. अशा विविध लढाया ज्या आपल्याला लढायला लागतात; त्याबद्दलची गोष्ट म्हणून ती 'महोगाथा'. निर्माती म्हणून हे नाटक सादर करताना मला असे जाणवते की, अशा प्रकारचे नाटक करण्यासाठी मुंबईमध्ये जागा कमी आहेत. पण जिथे टिपिकल नाटक केले जाते, त्या व्यतिरिक्तही हे नाटक सादर करता येऊ शकते. रंगभूमीसह कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी, जिथे नाटकांचे प्रयोग होतात अशा विद्यापीठांमध्ये, शाळांमध्ये, इतर संस्थांमध्येही या नाटकाचे प्रयोग करता येऊ शकतात. यासाठी नाटकाचे डिझाईन असे केले आहे की ते नॉन परफॉर्मिंग स्पेसेसमध्ये सुद्धा सादर करता येईल.
या नाटकात चार मुख्य कलाकार आहेत आणि त्यातले दोन अतिशय नवीन आहेत. विक्रम होता या युवा कलाकाराने या नाटकासाठी काही गीते लिहिली आहेत आणि संगीतही दिले आहे. मुक्ती साधना ही नवोदित कलाकार नाटकात आहे. तिने आतापर्यंत सोशल सेक्टरमध्ये खूप काम केले आहे आणि आता पहिल्यांदाच ती नाटकात काम करत आहे. यांच्यासोबतच गेली अनेक वर्षे नाटक, सिनेमा आणि सिरीयल्समध्ये काम करणारा हृदयनाथ जाधव नाटकात आहे. खूप वर्षांपूर्वी आम्ही एकत्र काम केले होते आणि आता आम्ही पुन्हा एकत्र काम करतोय. यांच्यासह मीही या नाटकात भूमिका करत आहे, असे खूप वेगवेगळे अनुभव असलेले आणि वेगवेगळे टॅलेंट असलेले कलाकार या नाटकात भूमिका साकारत आहेत.


या नाटकाचे दिग्दर्शक मंगेश सातपुते यांना यासंबंधी बोलते केले असता ते सांगतात, "या नाटकाचे दिग्दर्शन करताना एक योगायोग असा आहे की, पुन्हा एकदा साहित्यकृतीवर आधारित नाटक माझ्या वाट्याला आले आहे. दिग्दर्शक म्हणून मी प्रथमच अशा पद्धतीने काम करतोय की, ज्याला डिव्हाईस थिएटर असे म्हणतात. अगदी सुरुवातीपासून सर्वांनी मिळून त्यात एकत्रपणे काम करायचे असते. शून्यातून विश्व निर्माण करणे असे आपण ज्याला म्हणतो, तशा पद्धतीचे हे काम असते. मूळ कथा वाचून, त्यावर चर्चा करून, विचारमंथन करून, त्याचे स्क्रिप्टिंग, गाणी वगैरे असे सर्व काही एकत्रित पद्धतीने चर्चा करून, ठरवून मग ते नाटक फ्लोअरवर जाते. हे खूप आव्हानात्मक आहे यात प्रश्नच नाही. या नाटकातून जो संदेश दिला जाणार आहे, त्यासाठी रसिकांनी या नाटकाचा अनुभव घ्यायला हवा. आपल्या भोवताली जे घडतेय, ते आपल्याला कमीत कमी माहीत तरी असले पाहिजे. त्या विरोधात बोलणे, उठाव करणे वगैरे नंतरच्या गोष्टी; पण कमीत कमी आपल्याला आपल्या आजूबाजूला नक्की काय घडतेय; म्हणजे पर्यावरणाच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत, आरोग्य सुविधांच्या बाबतीत नेमके काय चालले आहे आपल्यासोबत हे माणूस आणि नागरिक म्हणून आपल्याला माहीत असले पाहिजे. या गोष्टींसाठी हे नाटक महत्त्वाचे आहे".

Comments
Add Comment

मुंबईला आल्यावर ‘कलावैभव’मध्ये काम करण्याची मिळाली संधी : सचिन देशपांडे

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  सचिन देशपांडे यांनी अभिनयाच्या क्षेत्रात आपले स्थान भक्कम केले आहे. गेली पंचवीस

रंगकर्मींच्या नाट्यकट्ट्याची मुहूर्तमेढ...!

राजरंग : राज चिंचणकर नाट्यसृष्टीत विविध उप्रक्रमांची पायाभरणी केली जाते आणि यातले काही उपक्रम सातत्याने सुरु

व्याधींच्या आधीची समाधी

भालचंद्र कुबल : पाचवा वेद आमच्या पुष्पा भावे मॅडम नेहमी जयंताची उदाहरणे द्यायच्या, जयंता म्हणजे जयंत पवार..! मला

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेने येसूबाई म्हणून ओळख दिली

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  इतिहासाची साक्ष आणि वर्तमानाचा संघर्ष यांची सांगड घालणारा 'भिडेवाडा' हा चित्रपट

सरपंच-उपसरपंचांची जुगलबंदी रंगणार

शशांक शेंडे आणि ओंकार भोजने आमने-सामने गावच्या राजकारणात सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोक-झोक नेहमीच चर्चेचा

कलाकारांची चैतन्यमय गुढी...

राजरंग : राज चिंचणकर पली संस्कृती, परंपरा आपल्या सण आणि उत्सवांत अधिक उजळून निघते. नववर्षाचा शुभारंभ करत चैतन्य