एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या
खासदार नरेश म्हस्के यांचे रेल्वे मंत्री आणि कोकण रेल्वेच्या अध्यक्षांना खरमरीत पत्र
ठाणे : कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्यांचे अप आणि डाऊन मार्गावरचे वेळापत्रक साफ कोलमडले आहे. सात तास, पाच तास विलंबाने गाड्या धावत आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आणि नाराजीची लाट आहे. विलंबाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत रेल्वे मंत्री आणि कोकण रेल्वेचे चेअरमन यांना खरमरीत पत्र लिहीत कायमस्वरूपी ठोस तोडगा काढण्याची सूचना केली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या सातत्यपूर्ण अनियमिततेमुळे कोकणात सणासुदीच्या काळात जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या मार्गावरील जवळपास सर्वच प्रमुख गाड्या नियमितपणे तासन्तास उशिराने धावत असून ही परिस्थिती आता अपवाद न राहता नियमच बनली आहे. रोजच्या या विलंबामुळे… pic.twitter.com/mGbQoK5BGW
— Naresh Mhaske (@nareshmhaske) March 2, 2026
खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि कोकण रेल्वेच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या बहुतांश प्रमुख गाड्या या निर्धारित वेळेपेक्षा तासन्तास उशिराने धावत असून ही बाब आता अपवाद नसून रोजचीच समस्या बनली आहे. या सततच्या विलंबामुळे प्रवाशांच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यावर गंभीर परिणाम होत असून मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
दिनांक १ मार्च २०२६ रोजीचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, प्रीमियम समजली जाणारी सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस २२११९ ही गाडी सुमारे सात तास उशिराने धावत होती. तिकिटात जेवणाचा समावेश असून सुद्धा प्रवाशांना जेवण मिळालेले नाही. जेव्हा तेजससारख्या प्रतिष्ठित गाडीची ही अवस्था असेल, तर इतर एक्सप्रेस व प्रवासी गाड्यांची स्थिती किती बिकट असेल याची कल्पना करता येणे कठीण असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
गाड्यांच्या विलंबनाबाबतची एसएमएस सूचना प्रणाली विश्वासार्ह नसल्याची तक्रारही त्यांनी केली आहे. अनेक प्रवाशांना वेळेवर कोणतीही माहिती न मिळाल्याने त्यांना रेल्वे स्थानकांवर तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे.
होळी, पालखी त्यांनतर मे महिन्याची सुट्टी आणि येणाऱ्या सण उत्सवानिमित्त लाखो कोकणवासी रेल्वेने आपल्या गावी जात असतो. कोकण रेल्वेचा प्रवास हा सुखकर आणि सुरक्षित असल्याची प्रवाशांची भावना आहे. रेल्वेमुळे प्रवासातील वेळेचीही बचत होत असते. त्यामुळे लाखो कोकणकर रेल्वे प्रवासाला प्राधान्य देत असतात. त्यामुळे प्रवाशांच्या भावनेचा आदर करून कोकण रेल्वे प्रशासनाने केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर न थांबता वेळेचे काटेकोर नियोजन प्रभावी करून तांत्रिक सुधारणेवर भर देऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.






