राजरंग : राज चिंचणकर
रुपेरी पडद्यावर मोठ्या उत्साहात झळकणाऱ्या मराठी सिनेमांनी वर्षानुवर्षे चालत आलेली आपली परंपरा कायम राखली आहे. मात्र काळाच्या या प्रवाहात मराठी सिनेमाने अनेक चढउतारही पाहिले. या काळात काही सिनेमांनी अनेक आठवडे हाऊसफुल्लचे बोर्ड पाहिले; तर काही सिनेमा भुईसपाट झाले. मात्र मराठी सिनेमांची ही परंपरा आजतागायत नव्या उमेदीने मार्गक्रमण करत राहिली आहे. सध्याच्या काळात मराठी सिनेमाने जोरदार मुसंडी मारल्याचे आश्वासक चित्र दिसून येत आहे. यंदाचे वर्ष उजाडल्यापासून जे काही मराठी सिनेमे प्रदर्शित झाले; त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता येत असलेल्या होळीच्या रंगमयी दिवसांतही, आशयघन आणि आघाडीचे कलावंत असलेले मराठी सिनेमे पडद्यावर येत असून, या दिवसांत मराठी सिनेमांची रंगपंचमी उत्साहात साजरी होणार असल्याची चिन्हे आहेत. मराठी सिनेरसिक आता पुन्हा एकदा सिनेमागृहांवर गर्दी करू लागले आहेत. याला विविध कारणे असली तरी प्रेक्षकवर्ग मराठी सिनेमांना पुन्हा एकदा उचलून धरत असल्याचे सकारात्मक दृश्य आहे. मात्र असे असले तरी मराठी सिनेमा बऱ्यापैकी आधीच्या पिढीवर अवलंबून असल्याचे दिसते. युवा पिढीला सिनेमांसाठी सोशल माध्यमावरची अनेक व्यासपीठे खुणावत असल्याने आणि एकंदरीतच सध्याचे गतिमान जीवनमान पाहता सिनेमागृहांकडे तरुणांची पावले कमी वळत असल्याने, आज जो काही मराठी सिनेमा सिनेमागृहात चालतो; तो बहुतांशी मागच्या पिढीच्या जीवावर असे चित्र आहे. नाही म्हणायला काही निर्मात्यांनी तरुणाईला आकर्षित करतील अशा मराठी सिनेनिर्मितीचा ध्यास घेतलेला दिसतो. त्याला तरुणवर्गाची गर्दी होताना दिसते; परंतु एकंदरीतच मागची पिढी सिनेमागृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहण्यास अधिक प्राधान्य देत आहे.
मध्यंतरीच्या काळात मात्र मराठी सिनेमाला ओहोटी लागल्याचे चित्र होते. या काळात मराठी सिनेमांची निर्मिती धडाक्यात होत होती; पण काही अपवाद वगळता, सिनेमे पडद्यावर आले कधी आणि गेले कधी हा चर्चेचा मुद्दा होता. साहजिकच, अशा सिनेनिर्मितीच्या मागे असणाऱ्या संपूर्ण टीमची मेहनत, आर्थिक गुंतवणूक हे सर्व काही वाया जात होते. पण हे चित्र तसेच राहिले नाही. मराठी सिनेमांनी सध्या कात टाकल्याचे दिसून येत आहे. कौटुंबिक, सामाजिक, करमणूकप्रधान आदी विषयांच्या व्यतिरिक्तही अनेकविध आश्वासक विषयांची पेरणी केलेले मराठी सिनेमे सध्या प्रदर्शित होत असून, त्यांना रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. रसिकांच्या भावविश्वाला स्पर्श करतील असे विषय आणि त्यासोबतच आघाडीचे कलावंत यांची उत्तम भट्टी सध्याच्या मराठी सिनेमांत जुळून आल्याचे स्पष्ट होत असून, प्रेक्षकवर्गही त्याकडे आकर्षिला जात आहे. यात नवीन सिनेमांची निर्मिती तर आहेच; परंतु काही जुन्या, गाजलेल्या मराठी सिनेमांचे सिक्वेलही लक्ष वेधून घेत आहेत. या सिक्वेलना पूर्वपुण्याईचा अर्थातच फायदा होत आहे.
अलीकडे प्रदर्शित झालेले 'दशावतार', 'आता थांबायचं नाय', 'पुन्हा शिवाजीराजे भोसले', 'रणपती शिवराय : स्वारी आग्रा', 'पुन्हा एकदा साडे माडे तीन', 'माया', 'क्रांतिज्योती विद्यालय : मराठी माध्यम' आदी सिनेमे रसिकांच्या पसंतीस उतरले आहेत. येत्या काळात 'सुपर डुपर', 'तिघी', 'मर्दिनी', 'राजा शिवाजी', 'फुला', 'ट्रायंगल' हे आणि असे काही महत्त्वाचे सिनेमे रुपेरी पडद्यावर येत आहेत. त्यांनाही प्रेक्षकवर्ग चांगला प्रतिसाद देईल असे चित्र आहे. अलीकडे मराठी सिनेमा केवळ प्रदर्शित होत नाहीत; तर बॉक्स ऑफिसवर ते गाजतात आणि वाजतातही. मराठी सिनेमांच्या निर्मितीची कक्षा सध्या रुंदावली असून, मोठ्या संख्येने मराठी सिनेमा प्रदर्शित होत आहेत. स्वतंत्रपणे निर्मिती केलेले सिनेमे असोत, जुन्या सिनेमांचे सिक्वेल असोत किंवा ठरवून केलेल्या काही सिनेमालिका असोत; या सर्वांना सध्या रसिकाश्रय मिळत आहे. मराठी बॉक्स ऑफिसवरचे मळभ यानिमित्ताने दूर झाले असून, मराठी सिनेमांसाठी हे आशादायी चित्र आहे.