पाचवा वेद : भालचंद्र कुबल
२५ व्या भारत रंग महोत्सवाचे आयोजन दिनांक २७ जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ रोजी दिल्लीत प्रचंड उत्साहात पार पडले. एका अर्थी भारतभरातल्या रंगकर्मींसाठी हा महाकुंभच म्हणावा लागेल आणि त्यात महाराष्ट्राचे योगदान हे अपरिहार्यच होते. यंदा प्रथमच विदेशातील ११ देश या मेळ्यात आपल्या कलाकृतींसह सामील झाले होते. देशभरातील ५२ केंद्रांवर ‘भारंगम’मधील नाट्य मंडळांना ख्यातनाम कलाकारांच्या अदाकारीला येथे प्रेक्षकांची दाद मिळाली. विविध विषयांवरील परिसंवादांचा या कार्यक्रमांमध्ये सहभाग होता. दिल्लीसह देशभर एकूण ५२ ठिकाणी कार्यक्रमांची रेलचाल चालू होती. युवक आणि लहान मुलांमध्ये महोत्सवाची खास उत्सुकता दिसली. नाट्य विद्यालयाच्या परिसरासह दिल्लीत १४ ठिकाणी कार्यक्रम झाले. विदेशातील प्रवासी भारतीयही भारंगमचा भाग झाले. अनेक राज्यांच्या कला विभाग आणि अकादम्यांनी सहकार्य केले आणि यंदाचा भारंगम न भूतो न भविष्यती स्वरूपात पार पडला. राहून राहून एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटत राहिले की मराठी माध्यमानी मराठी कलाकारांचे फार मोठे योगदान या महोत्सवासाठी असूनही फारशी दखल घेतली गेली नाही. मराठीतील अनेक नाट्यप्रयोगांची थुकरट निरीक्षणे लिहिणाऱ्या समाज माध्यमातील समीक्षाकारांनाही या भव्य-दिव्य सोहळ्याबाबत सोयरसूतक नव्हते. मराठी नाटकांबाबत वैश्विक पातळीवर काय भावना प्रकट होतायत याचे विवेचन तर सोडाच पण स्वतःची टिमकी मिरवणाऱ्या तरुणाईच्या वृत्तपत्रानी या महोत्सवाकडे पाठ फिरवली होती.
हा नाट्यमहोत्सव आयोजित करण्यामागील मुख्य संकल्पना, रंगमंचाचे लोकतंत्रीकरण, सार्वभौमिकता आणि सांस्कृतिक समावेशकता वाढवणे हे आहे. हे विविध भाषा, शैली, क्षेत्र आणि विचारधारांचे एकत्रीकरण करून रंगमंचाला 'जनतेचा महाकुंभ' बनवते, ज्यात सामान्य लोकांसाठी गैर-कुलीन आंतरराष्ट्रीय उत्सव घडवला जातो. भारंगम महोत्सव विविध समुदाय, वयोगट आणि भाषिक परंपरांचा समावेश करून भारताचाच नव्हे, तर जगाचा सद्याच्या रचनात्मक वारसा दर्शवतो. यात आदिवासी, बाल, पूर्वोत्तर, कठपुतळी, नृत्यनाट्य, संस्कृत नाट्य आणि मायक्रो ड्रामा यांसारख्या उप-उत्सवांद्वारे रंगमंचाची वैश्विक व्याप्ती वाढवली जाते, याचे साधे भानही मराठी माध्यमाना नव्हते. मराठी माध्यमांचा एकही प्रतिनिधी या महोत्सवादरम्यान दिसून आला नसला तरी दिल्लीतील मराठी प्रेक्षकवर्ग मराठी नाटकांना आणि मराठी कलाकारांनी सादर केलेल्या कलाकृतीना आवर्जून उपस्थित होता, त्यांना दाद देत होता, आत्मियतेने भेट घेत होता.
२०२६ च्या भारंगम आवृत्तीची संकल्पना 'संवाद संस्कृती' वर आधारित होती, २२८ भाषा-बोलींमध्ये २८९ प्रदर्शनांद्वारे सातही खंडांतील संस्कृती जोडल्या गेल्या, हे सारं अकल्पित होतं. यामुळे महिला दिग्दर्शक, दुर्मीळ समुदाय आणि नवीन प्रायोगिक नाटकांना प्रोत्साहन दिल्याने रंगमंचाच्या विविधतेली बळकटी हे त्यामागील प्रयोजन होते. भारत रंग महोत्सव २०२६ चे मुख्य उद्घाटन २७ जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) मंडी हाउस परिसरात भव्यरीत्या झाले. केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न झाला. उद्घाटन सोहळ्यात 'रंग संगीत' या विशेष संगीत कार्यक्रमाने प्रारंभ झाला, ज्यात वनराज भाटिया व बी. व्ही. करंत यांच्या सुप्रसिद्ध रचनांना एनएसडी रिपर्टरी कंपनीने सादर केल्या गेल्या. देश-विदेशातील कलाकार, रंगकर्मी आणि दर्शकांच्या उपस्थितीत हा समारंभ साजरा झाला, ज्याने महोत्सवाची वैश्विक व्याप्ती अधोरेखित केली गेली. मुंबईत १० फेब्रुवारीला रवींद्र नाट्य मंदिरात महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी मुंबई पर्वाचे उद्घाटन केले तर प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी व मीता वशिष्ठ उपस्थित होत्या. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा आवृत्तीचे साखळी येथे उद्घाटन केले. ही सर्व उद्घाटने महोत्सवाच्या समावेशक संकल्पनेचे प्रतीक ठरली. दिल्ली येथील महोत्सवात लोककला, पथनाट्ये, परिसंवाद, मास्टरक्लासेस- कार्यशाळा आणि लोकनाट्ये यांचा समावेश होता. ३३ महिला दिग्दर्शित नाट्ये, स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारकांवर आधारित विशेष नाट्ये, थिएटर बाजार (नवीन नाटकांचा प्रचार), श्रुती अंतर्गत १७ पुस्तक प्रकाशने आणि दुर्मीळ सामाजिक गटांच्या (ट्रान्सजेंडर, सेक्स वर्कर्स इ.) नाट्यांचा प्रथमच समावेश केला गेला.
भारंगम आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवात यंदा मधुर भांडारकर, महेश मांजरेकर, विजय केंकरे, अभिजित पानसे, भालचंद्र कुबल, ऋता पंडीत आदी दिग्गजांच्या कलाकृतीना प्रचंड दाद मिळाली. अभिजित पानसे आणि मी दिग्दर्शित केलेल्या विजय तेंडुलकर लिखात हिंदी घासीराम कोतवाल नाटकाला कमानी आॅडीटोरीयममध्ये हाऊसफुल्ल गर्दी लोटली होती. तीच स्थिती महेश मांजरेकरांच्या लव्हेबल रास्कल या नाटकाबाबत होती. विजय केंकरे यांचे "शू... घाबरायचं नाही" या नाटकानेही प्रचंड वाहव्वा मिळवली. या सर्व नाटकांचा परामर्श लिहायचाच आहे कारण आपल्या गल्लीपेक्षा बाहेरील प्रदेशात मिळणारा अन्य भाषिकांचा प्रतिसाद आणि उत्तेजन कुठल्या लेवलला असते, याचा अनुभव मराठी रंगकर्मी या नात्याने भारावून टाकणारा होता, असतो आणि राहिल. भारतीय रंगभूमीचे आणि त्यातही मराठी रंगभूमीचे भविष्य उज्ज्वल, गतिमान आणि शक्यतांनी परिपूर्ण आहे. २०२५-२६ चे ट्रेंड अशा कलाकृतींच्या दृश्यात्मकतेकडे अंगूली निर्देश करतायत जे तंत्रज्ञानाने अधिक प्रगत, कथनात्मकदृष्ट्या धाडसी आणि प्रेक्षकांशी खोलवर जोडलेले असतील. तंत्रज्ञान नवीन सर्जनशील साधने देत राहिल्याने आणि कथाकार भारतीय जीवनातील समृद्ध विविधतेचा शोध घेत राहिल्याने, रंगमंच प्रतिबिंब, संबंध आणि आश्चर्यांसाठी एक शक्तिशाली जागा राहील यात शंकाच नाही. भारंगम आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव हा याचा पुरावा आहे.