Eknath Shinde : "दादा, तुमचा हा निर्णय चुकला, परत या...!" विधान परिषदेत अजित पवारांच्या आठवणींनी एकनाथ शिंदे भावूक

हॉटेल 'हयात'मधील तो शब्द आणि वडिलकीचा सल्ला; शिंदेंनी जागवल्या अजितदादांच्या मैत्रीच्या आठवणी


मुंबई : "एखाद्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती जावी आणि अख्खं घर पोरकं व्हावं, तशीच अवस्था आज अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राची झाली आहे. लाखांचा पोशिंदा हरपल्याने लाखो लोक अनाथ झाले आहेत," अशा अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांना विधान परिषदेत श्रद्धांजली वाहिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव मांडताना शिंदेंनी दादांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासावर भाष्य केले. ते म्हणाले की, "दादा, राजकारणाच्या पटलावर तुम्ही घेतलेले अनेक धाडसी निर्णय अचूक होते, यावर जनतेनेही शिक्कामोर्तब केले आहे; मात्र तुमचा हा जगाचा निरोप घेण्याचा निर्णय मात्र साफ चुकला आहे. तो निर्णय मागे घ्या आणि परत या," असे म्हणताना उपमुख्यमंत्र्यांचा आवाज गहिवरला होता.



'ट्रँगल ऑफ स्टॅबिलिटी' कोसळला


अजितदादा, देवेंद्र फडणवीस आणि स्वतःचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, "आम्ही तिघे म्हणजे राज्याच्या स्थैर्याचा एक भक्कम 'ट्रँगल ऑफ स्टॅबिलिटी' होतो. आम्ही एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राची प्रगती वेगाने सुरू होती. मात्र, २८ जानेवारीच्या त्या काळ्या दिवसाने आमचा हा आधार हिरावून नेला. दादा कधीच वेळ चुकवत नसत, पण त्या दिवशी नियतीने घात केला." अपघाताची दृश्ये पाहून आजही मनाचा थरकाप उडतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.



प्रशासनावरील पकड आणि 'फणसा'सारखे व्यक्तिमत्व


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या प्रशासनावरील पकडीचे आणि त्यांच्यातील माणुसकीचे अनेक पदर उलगडले. "प्रशासनात दादांची दहशत नाही, तर एक प्रकारची शिस्त होती," असे नमूद करत शिंदेंनी त्यांच्या कार्यशैलीचा गौरव केला. अजितदादांच्या हातामध्ये फाईल आली की, केवळ काही सेकंदांत त्यांची नजर संपूर्ण कागदावरून फिरत असे. एखाद्या 'स्कॅनर'प्रमाणे ते कागदपत्रांमधील बारकावे आणि चुका चटकन शोधून काढायचे. मंत्रालयातून चालताना साधी इलेक्ट्रिक वायर लटकलेली दिसली किंवा पायरीचे बांधकाम नीट नसल्याचे लक्षात आले, तरी ते संबंधित अधिकाऱ्यांची जागेवरच कानउघाडणी करायचे. त्यांच्या या सूक्ष्म निरीक्षणाने प्रशासनात कामाची गती आणि अचूकता राहिली, असे शिंदे यांनी सांगितले. अजितदादांच्या आर्थिक कौशल्याचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा ऐतिहासिक विक्रम त्यांच्या नावावर आहे. राज्याच्या तिजोरीवर ताण पडू न देता 'लाडकी बहीण' योजनेसारख्या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करणे, हे त्यांच्या अर्थकारणावरील पकडीचेच उत्तम उदाहरण होते. दादांचे व्यक्तिमत्व बाहेरून फणसासारखे काटेरी आणि कडक वाटले, तरी आतून ते अत्यंत मृदू आणि संवेदनशील होते. "एकनाथराव मुख्यमंत्री असतील तर आम्हाला चालेल," असे हयात हॉटेलमधील त्या निर्णायक बैठकीत ठामपणे सांगणारे दादाच होते, अशा शब्दांत शिंदेंनी त्यांच्यातील मैत्री आणि विश्वासाची आठवण सांगितली. केवळ राजकीय सहकारी म्हणूनच नव्हे, तर मोठ्या भावाच्या नात्याने "रात्री उशिरापर्यंत काम करू नका, तब्येतीकडे लक्ष द्या," असा वडिलकीचा सल्ला दादा मला नेहमी द्यायचे, असे सांगताना शिंदे काही काळ गहिवरले.



मैत्रीचे किस्से आणि विश्वास


"आमचे नाते केवळ राजकीय सहकाऱ्यांचे नव्हते, तर त्यात कौटुंबिक जिव्हाळा होता," असे सांगताना शिंदेंनी हॉटेल 'हयात'मधील एका अत्यंत महत्त्वाच्या राजकीय प्रसंगाची आठवण करून दिली. ज्या वेळी राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींना वेग आला होता आणि चर्चेचे गुंफण सुरू होते, तेव्हा अजितदादांनी अत्यंत मोठेपणा दाखवत 'एकनाथराव मुख्यमंत्री होणार असतील, तर आम्हाला काहीच हरकत नाही' असा शब्द टाकला होता. त्यांच्या या एका शब्दाने माझ्यावरील त्यांचा विश्वास आणि आमच्यातील मैत्रीची खोली स्पष्ट केली होती, असे शिंदे यांनी नमूद केले. राजकारणाच्या धकाधकीतही अजितदादा एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे आपली काळजी घेत असत, हे सांगताना मुख्यमंत्री भावूक झाले होते. प्रशासकीय कामात शिस्तीचा बडगा उगारणारे दादा खाजगी आयुष्यात किती हळवे आणि काळजीवाहू होते, हे सांगताना मुख्यमंत्र्यांचे डोळे पानवले होते. सत्तेच्या समीकरणांपलीकडे जाऊन जपलेली ही मैत्री आणि दादांनी दिलेला तो विश्वास राज्याच्या राजकारणातील एक सुवर्ण पान असल्याची भावना यावेळी शिंदेनी व्यक्त केली.



उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिला सुनेत्रा वहिनींना आधार


विधान परिषदेत शोकप्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ अजित पवार यांच्या आठवणींनाच उजाळा दिला नाही, तर त्यांच्या कुटुंबियांनाही अत्यंत भावनिक आधार दिला. उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उद्देशून बोलताना शिंदे म्हणाले की, "ताई, आज तुमच्यावर आभाळाएवढे दुःख कोसळले आहे, तरीही तुम्ही ज्या धैर्याने उभ्या आहात ते पाहून आम्हाला अभिमान वाटतो. पण स्वतःला कधीही एकटे समजू नका; तुमचे हे दोन्ही भाऊ (मी आणि देवेंद्रजी) प्रत्येक संकटात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत." ही ग्वाही देताना सभागृहात एक भावनिक वातावरण निर्माण झाले होते. अजितदादांच्या ध्येयधोरणांचा उल्लेख करताना त्यांनी 'विकासाच्या' मुद्द्यावर विशेष भर दिला. "दादांनी पाहिलेले महाराष्ट्राच्या प्रगतीचे स्वप्न अधुरे राहू देणार नाही. त्यांनी दिलेली 'विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही' ही घोषणा केवळ शब्द नसून तो आमचा संकल्प आहे. त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरवणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल," अशा शब्दांत शिंदेंनी आपला निर्धार व्यक्त केला. या शोकसभेत केवळ अजितदादाच नव्हे, तर राज्याच्या राजकारणात योगदान देणाऱ्या इतर ज्येष्ठ दिवंगत नेत्यांनाही मानवंदना देण्यात आली. माजी मंत्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक, माजी विधान परिषद सदस्य अशोक गजानन मोडक, गंगाधर पटने आणि श्रीमती निला देसाई यांच्या निधनाबद्दलही उपमुख्यमंत्र्यांनी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. राज्याच्या या थोर सुपुत्रांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

BMC : फेरीवाल्यांचा माल पकडून नेण्याच्या वाहनांवरच होतोय महापालिकेचा १२ ते १३ कोटींचा खर्च

उपयोग शून्यच! मुंबई (सचिन धानजी): मुंबईत अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी

Kurla Nehru Nagar Flood Prevention : कुर्ला पूर्व नेहरु नगरमधील तुंबणारे पाणी रोखण्यासाठी ७ कोटींचा बांध

- मिनी पंपिंग स्टेशनची उभारणीसह पुर प्रतिबंधक गेटचे बांधकाम मुंबई (विशेष प्रतिनिधी) कुर्ला (पुर्व) येथील नेहरु

Raosaheb Patwardhan Garden Development : वांद्रे पश्चिम येथील रावसाहेब पटवर्धन गार्डनचा होणार विकास

- तब्बल पाच कोटींचा केला जाणार खर्च मुंबई (विशेष प्रतिनिधी) वांद्रे पश्चिम येथील राबसाहेब पटवर्धन उद्यानाचा आता

Maharashtra Weather Alert : ऑगस्टअखेर पावसाची उघडीप; विदर्भात मात्र पावसाचा जोर, कोकणासह राज्यात हवामानाचा ‘असा’ अंदाज

मुंबई : ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने काहीशी उघडीप घेतली आहे. मात्र विदर्भातील

Mumbai Crime : बापरे! गरोदर राहिलेल्या प्रेयसीचा असा काढला काटा... प्रियकराचा तो एक कट अन् सगळंच संपलं

मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात गरोदर महिलेच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेत

Mumbai Accident : मुंबईत वेगवेगळ्या अपघातांत दोन महिलांनी गमावला जीव, पोलिसांकडून गुन्हा दाखल

मुंबई : चेंबूर आणि माटुंगा परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातांत मोटरसायकलवर मागे बसून प्रवास