मुंबई-विजयदुर्ग जलप्रवासाचा १ मार्चपासून श्रीगणेशा; मंत्री नितेश राणे यांचे स्वप्न साकार
मुंबई : कोकणच्या लाल माती ओढ असलेल्या चाकरमान्यांसाठी यंदाचा शिमगोत्सव विशेष ठरणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेली मुंबई ते विजयदुर्ग ही जलवाहतूक सेवा १ मार्चपासून अधिकृतपणे सुरू होत आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा सुरू करण्यात येत असून, यामुळे मुंबई-कोकण प्रवासाचा एक नवा अध्याय सुरू होणार आहे.
एकेकाळी मुंबई ते कोकण अशी सुरू असलेली जलवाहतूक एका अपघातानंतर बंद झाली होती. ही सेवा पुन्हा सुरू व्हावी, अशी मागणी सातत्याने होत होती. नितेश राणे यांनी बंदर विकास खात्याची सूत्रे हाती घेतल्यापासून या मार्गावर सेवा सुरू करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले होते. त्यांच्या मेहनतीला आता यश आले आहे. 'एम२एम' कंपनीच्या माध्यमातून ही 'रो-रो' फेरी सेवा चालवली जाणार असून, यामुळे सागरी पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे. ७ तासांत विजयदुर्ग गाठणे शक्य
रस्ते वाहतुकीतील कोंडी आणि रेल्वे आरक्षणाची अडचण लक्षात घेता, ही जलवाहतूक सेवा कोकणवासीयांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या सेवेसाठी 'एम२एम प्रिन्सेस' हे आधुनिक जहाज चालवले जाणार असून, एका फेरीमध्ये ६२० प्रवासी आणि ३५ वाहने नेण्याची त्याची क्षमता आहे. या जहाजामुळे अवघ्या ६ ते ७ तासांत मुंबईहून विजयदुर्गला पोहोचता येईल. वेळापत्रक आणि नियोजन
या सेवेची उद्घाटन फेरी १ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ वाजता मुंबईतील 'फेरी व्हार्फ' (भाऊचा धक्का) येथून मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत निघणार आहे.
मुंबईहून प्रस्थान : दर बुधवारी व शनिवारी सकाळी ८.०० वाजता. विजयदुर्गहून प्रस्थान : दर गुरुवारी व रविवारी दुपारी १२.०० वाजता.
तिकीट दर असे - इकॉनॉमी - ३,००० - प्रीमियम इकॉनॉमी - ५,००० - बिझनेस - ७,००० - फर्स्ट क्लास - ९,०००
वाहनांसाठी शुल्क - दुचाकी : १,००० - सायकल : ६००
पर्यटनाला मिळणार चालना
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जलवाहतूक प्रोत्साहन धोरणांतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे. यामुळे कोकणातील पर्यटन, व्यापार आणि प्रादेशिक संपर्काला मोठी गती मिळेल," असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे. या फेरीसाठी तिकीट विक्री सुरू झाली असून, इच्छुकांना www.m2mferries.com, https://www.m2mferries.com या संकेतस्थळावर जाऊन बुकिंग करता येईल.







